Did you like the article?

Showing posts with label suicide. Show all posts
Showing posts with label suicide. Show all posts

Sunday, August 28, 2022

 

 वरच्या आणि खालच्या जातींतील प्रेमप्रकरण आणि शोकांतिका

 

आज सकाळचीच घटना. घरी काही सुतारकाम चालू आहे.. मध्यंतरी सिल्व्हासातील घरची माणसे सुट्टीचा मोसम साधून आली होती त्यामुळे हाती घेतलेलं फर्निचरचं खंडीत झाले होते. आज पुन्हा आमचे नेहेमीचे कंत्राटदार मिस्त्री कामगार घेऊन आले होते. 

 

थोड्या वेळाने त्यांनीच तो विषय काढला. "आमच्याकडं ते प्रकरण झालं ते तुम्हाला कळलं असल ना?"'

मी म्हटलं " नाही.. काय झालं?"

 

मिस्त्री आमच्या इमारतीला लागून असलेल्या रस्त्याच्या पलिकडच्या चाळीत राहतात. पण ही मोठी घटना माझ्या कानावर आली नव्हती.

 

"आमच्याशेजारी आलेल्या नात्यातल्या एका तरण्याताठ्या मुलीनं गळफास घेतला..तीनचार दिवस झालेत..काही पाहूणेरावळे अजून आमच्याकडेच हायत.."

 

अन् मग मिस्त्री सुरुवातीपासून ती घटना सांगू लागले.

 

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या जावयाकडची एक मुलगी उस्मानाबादहून अचानक इकडं शहरात शिकायला आली होती. चौदावी की पंधरावीला होती. ॲडमिशन फी भरली, वह्या पुस्तकं पण घेतली.

 

"तरी मी पाहुण्याला विचारलं .." मिस्त्री सांगत होते

 

"अचानक गावाहून या पोरीला का आणलं..? काही प्रॉब्लेम हाय का? विचारपूस करून घ्या आणि काही विषय असला तरी सामोपचाराने मिटवून घ्या..'

 

आठ दिवसांपूर्वी त्या मुलीला गावाकडच्या तिच्या बहिणीचा फोन आला.

 

गेली काही वर्षे तिच्या प्रेमात असलेल्या गावातल्या त्या पोरानं गळफास लावून घेतला होता.

 

ही मुलगी तिच्या घरच्या लोकांनी लांबवरच्या शहरात पाठवून दिल्यानं तो तरुण अस्वस्थ झाला होता. तो स्वतः वरच्या जातीतला तर ही पोरगी खालच्या जातीतली..... गावातल्या सगळ्या लोकांना त्याचं प्रेमप्रकरण माहित झालं होतं.. म्हणून तर त्या पोरीच्या घरच्या लोकांनी तिला गावातून तिच्या मामाकडे आमच्या शहरात शिक्षणासाठी पाठवून दिलं होत.

 

ते अखेरचं पाऊल उचलण्याआधी त्या तरुणाने आपल्या घरच्या लोकांना त्यांचा 'शेवटचा निर्णय काय ? 'असं विचारलं होतं..

 

"तुमचा फायनल निर्णय काय आहे ते सांगा मला.. मला त्या मुलीशीच लग्न करायचे आहे.. "असं त्यानं स्पष्ट केलं होतं.

 

"ते शक्य नाही.. त्या जातीतली मुलगी लग्न करून आपल्या घरात येऊ शकणार नाही.." घरच्यांनी पण आपला निर्वाणीचा निर्णय त्याला सांगितला होता.

 

त्या दिवशी दुपारी साडेतीनच्या आसपास त्या तरुणानं घरातल्या पंख्यास गळपास लावून मग आपला स्वतःचा निर्णयसुद्धा जगजाहीर केला होता..

 

अठरावीस एकर जमीनजुमला असलेल्या त्या घरातला तो एकुलता मुलगा होता..

ही बातमी तिच्या बहिणीने फोनवरून लगेच कळवल्यावर शहरातली ही मुलगी भयंकर अस्वस्थ झाली होती.. दोन दिवस तिचं मानसिक स्वास्थ बिघडलं होतं.

 

तिसऱ्या दिवशी दुपारी चाळीतल्या तिच्या घरी कुणीच नव्हतं. काही वेळानं कुणी तरी घरी परतलं तेव्हा ही पंख्याला लटकलेली दिसली. घाईघाईनं तिला खाली उतरवलं आणि दवाखान्यात नेलं. पण खूप उशीर झाला होता.

 

घरी तिनं लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं..

 

"त्याला जाळलं तिथंच मला पण जाळा.. माझी एव्हढी इच्छा पुरी करा..'"

 

उस्मानाबाद, औरंगाबाद आणि इतर ठिकाणाहून शे-दिडशे लोक मयतीला शहरात आली होती.

 

तिची शेवटची इच्छा पूर्ण करणं अर्थातच शक्य नव्हतं..

 

इतकं बोलून मिस्त्रींनी आपल्या मोबाईलवरचा अठरा वर्षांच्या त्या सुंदर तरुणीचा फोटो दाखवला. डोळ्यात चटकन पाणी आलं..

 

"आमच्यात दहावा-तेरावा नसतो. आमच्या रीतिरिवाजानुसार दोन दिवसांत सर्व क्रियाक्रम इथं शहरातच आटोपून घेतली.. आमच्या जवळची चारदोन पाहुणे मंडळी अजून आहेत..उद्या परवा जातील. ""

 

मिस्त्री मला सांगत होते..