Did you like the article?

Showing posts with label red flag. Show all posts
Showing posts with label red flag. Show all posts

Tuesday, February 14, 2023

 ``स्टॉप, स्टॉप.. किधर जा रहो हो?''

त्या चारपाच आणि लागोपाठ आलेल्या आवाजांनी मी जागच्या जागी थबकलो. दुसरा पर्यायच नव्हता. पूर्ण काळ्या युनिफॉर्मात असलेल्या त्या लोकांनी त्या जिन्याजवळच्या एका कोपऱ्यात मला पूर्ण घेरले होते आणि सर्वांच्या हातांत माझ्या दिशेने रोखलेल्या स्टेनगन्स होत्या.
तो आवाज ऐकून एव्हाना पणजीतल्या त्या हॉटेल फिदाल्गोच्या रिसेप्शन काऊंटरपाशी आणि आजूबाजूला उभे असलेले इतर युनिफॉर्ममध्ये आणि सध्या पोशाखातले इतर अधिकारी माझ्याभोवती गोळा झाले होते. पण खरे सांगायचे म्हणजे मी अजिबात टरकलेलो नव्हतो.
मी घाबरण्याचा काही प्रश्नच नव्हता. इथे आता माझ्यासमोर उभे असलेल्या गोव्याच्या ज्येष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गोव्याचे सर्वात ज्येष्ठ असलेले इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) होते, जिल्हाधिकारी होते, पोलिस अधिक्षक होते आणि हे सर्व अधिकारी नवहिंद टाइम्सचा क्राईम आणि कॅम्पस रिपोर्टर म्हणून मला व्यक्तीश: ओळखत होते.
त्यामुळे आज बाहेरुन आलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला येथे जिन्यातच अडवून धरले असले तरी त्यांना `मी कोण' हे स्थानिक अधिकारी सांगणार होतेच.
ही घटना आहे ऐंशीच्या दशकातली. साल बहुधा १९८६ असावे. पणजी येथल्या १८वा जून रोडवर असलेल्या हॉटेल फिदाल्गो येथे असलेल्या एका कार्यक्रमासाठी वेळेवर येण्यास मला उशीर झाला होता. संध्याकाळचे सहा वाजले होते. माझी दुचाकी हॉटेलच्या दारापाशी लावून घाईघाईने माझी चामडी बॅग खांद्याला लावून हॉटेलात घुसून जिन्याच्या दिशेने मी धाव घेतली त्याचवेळी हा प्रकार घडला होता.
केंद्रिय गृहमंत्री बुटा सिंग यांच्या कार्यक्रमाची असाईनमेंट त्या दिवशी मला लावण्यात आली होती, बहुधा तो दिवस रविवार असावा, कारण त्या दिवशी मुख्य वार्ताहर प्रमोद खांडेपारकर यांची सुट्टी असल्याने तो महत्त्वाचा कार्यक्रम माझ्या नावावर लावण्यात आला होता. कार्यक्रम बहुधा वेळेत सुरु झाला होता आणि मी तेथे उशिरा पोहोचल्यावर या स्टेनगनधारी लोकांनी मला असे घेरले होते.
आता `मी कोण?' हे सांगण्याची पाळी माझ्यावर आली होती.
`I am Camil Parkhe, .. I am a reporter of The Navhind Times and I have this invitation to cover this pogrammeee.'',
माझे आय-कार्ड आणि कार्यक्रमपत्रिका दाखवत मी सांगितले.
एव्हाना गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे आयजीपी आणि कलेक्टरसाहेब माझ्या मदतीला धावले होते आणि माझ्या म्हणण्यास ते दुजोरा देत होते.
मात्र तरीसुद्धा दिल्लीहून आलेल्या साध्या वेशातल्या आणि करड्या नजरेच्या त्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे समाधान झाले नव्हते. माझ्या खांद्यावर अडकवलेली ती बॅग खोलून आतल्या वस्तू दाखवण्यास त्यांनी मला करड्या आवाजात सांगितलेे. त्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता.
मात्र तिथेच घात झाला !
युरोपात बल्गेरिया इथे पत्रकारितेचा अभ्यासक्रमासाठी गेल्यावर तेथून परतताना बरोबर आणलेल्या माझ्या मौल्यवान संग्रहात एक नाजूकसा पोर्टेबल टाईपरायटर, एक छोटासा रशियन-मेड कॅमेरा आणि ही आकर्षक चामडी बॅग होती. ही बॅग घेतल्यानंतर लगेचच बातमीदाराच्या त्या पारंपारिक शबनम बॅगला मी लगेच निरोप दिला होता.
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा (गुज) सरचिटणीस आणि वृत्तपत्र कामगार चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझी युरोपच्या बल्गेरिया आणि सोव्हिएत रशियाच्या या दौऱ्यासाठी माझी अग्रक्रमाने निवड करण्यात आली होती . `गुज'चा जनरल सेक्रेटरी म्हणून दररोज माझे काही ना काही काम असायचेच. त्यामुळे आज माझ्या त्या बॅंगमध्ये `त्या' दोन गोष्टी सापडणे साहजिकच होते.
`त्या' दोन गोष्टी होत्या, गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टर्सचा लालभडक रंगातील एकदिड मिटर आकाराचा बॅनर आणि `गुज'चे एक लेटरपॅड.
त्याकाळात देशातील सर्वच कामगार चळवळीत डाव्यांचा आणि समाजवाद्यांचा प्रभाव असायचा आणि युनियनचा झेंडा हमखास क्रांतीचे चिन्ह असणाऱ्या लाल रंगात असायचा ! जॉर्ज फर्नांडिस हे तर त्यावेळी माझे दैवत होते.
`गुज'चे म्हणजे एका कामगार संघटनेचा लाल रंगातला तो फलक पाहिल्यावर त्या सुरक्षा अधिकाऱ्यांची मुद्रा अधिकच कठोर झाली.
केंद्रिय गृहमंत्र्यांच्या भर कार्यक्रमात असा लाल फलक फडकवण्याचा माझा हेतू असेल तर आता ते शक्य होणार नव्हते.
माझ्या बॅगमधील तो लाल फलक पाहून माझ्या मदतीला धावून आलेल्या गोव्यातील ते सनदी आणि पोलीस अधिकारी आता दोन पावले मागे सारले. त्यांचे चेहेरे आता साफ पडले होते.
अर्थात माझ्या हेतूंबद्दल त्यांना काहीही शंका नसली तरी माझ्या मदतीसाठी आता ते फार काही करु शकत नव्हते हे मलाही कळून चुकले होते.
``हो, मी `गुज'चा - गोव्यातल्या पत्रकारांच्या युनियनचा - जनरल सेक्रेटरी आहे, हे माझे त्यासंबंधीचे ओळखपत्र..त्यामुळे माझ्याजवळ हा फलक आणि लेटरहेड नेहेमीच असते, '' या माझ्या स्पष्टीकरणाने त्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांचे समाधान झाल्याचे दिसले आणि मग त्यांनी लगेच तोडगा काढला.
कामगार संघटनेचा तो लाल फलक, लेटरहेड आणि इतर वस्तू असलेली माझी ती बॅग मी हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी ठेवावी आणि बातमीदार या नात्याने केवळ नोटपॅड आणि पेन घेऊन मी पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या कार्यक्रमास जावे अशी त्यांची सूचना होती.
कार्यक्रम तर कधीच सुरु झाला होता, त्यामुळे ती सूचना मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. केंद्रिय गृहमंत्र्यांच्या भाषणाची बातमी चुकवणे माझ्यासारख्या ज्युनियर रिपोर्टरला महाग पडले असते.
हातात स्टेनगन्स घेतलेल्या त्या ब्लॅक कॅट्स कमांडोजच्या माझ्यावर रोखलेल्या नजरा सांभाळत मी जिन्याच्या आठदहा पायऱ्या चढलो आणि त्या हॉलमध्ये प्रवेश केला.
समोरच पहिल्या रांगेतल्या पत्रकार कक्षात माझे पत्रकार सहकारी नवप्रभाचे गुरुदास सावळ, गोमंतकचे सुरेश काणकोणकर, राष्ट्रमतचे बालाजी गावणेकर वगैरे बसले होते, त्या पहिल्या रांगेत मी बसलो तरी प्रचंड रागाने मी धुमसतच होतो.
कार्यक्रमाचे आयोजक त्यावेळी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रिय गृहमंत्री बुटा सिंग आणि इतर व्यक्ती बसल्या होत्या आणि स्टेजवर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन असे चार ब्लॅक कॅट्स कमांडोज होते, मला जिन्यात ज्यांनी अडवले होते त्यांच्याचसारखे.
मुख्य पाहुणे बुटा सिंग बोलण्यासाठी पुढे आले तेव्हा लगेचच दोन ब्लॅक कॅट्सनी त्यांच्यापुढे स्टेनगन्स घेऊन पोझिशन घेतली आणि भाषण संपेपर्यंत ते तिथेच उभे राहिले.
ह्या नॅशनल सेक्युरिटी गार्डसच्या (एनएसजी ) किंवा ब्लॅक कॅट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरक्षायंत्रणेविषयी मी वाचले होते, पण आता पहिल्यांदाच या ब्लॅक कॅट्सना मी असे प्रत्यक्षात पाहत होतो.
पंजाबमध्ये सुवर्णमंदिरात ऑपेरेशन ब्ल्यु स्टार मोहिमेनंतर तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षासैनिकांकडून हत्या झाल्यावर व्हीआयपींसाठी या अत्यंत दक्ष आणि कार्यक्षम असलेल्या ब्लॅक कॅट्सची खास सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली होती.
कार्यक्रम संपल्यावर केंद्रिय मंत्री बुटा सिंग हॉलच्या बाहेर जाईपर्यंत आम्हा सर्वांना आपल्या जागीच थांबण्याची सूचना केली होती, मुख्य पाहुणे गेले, त्यांच्याबरोबर ते ब्लॅक कॅट्सही गेले आणि वातावरण एकदम सैल झाले.
काही आठवड्यांपूर्वी पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा बाका प्रसंग घडला. आपण `थोडक्यात जिवानिशी वाचलो' अशी खुद्द पंतप्रधानांची भावना झाली.
पंजाबच्या निवडणुक दौऱ्यातल्या सभेत आजही पंतप्रधानांनी त्यांच्या त्या भयकथेला उजाळा दिला
माझ्याबाबत अशीच घडलेली ही घटना मग मलाही आठवली.