Did you like the article?

Showing posts with label Hiwale. Show all posts
Showing posts with label Hiwale. Show all posts

Saturday, May 29, 2021

``ऐ मेरे अहमदनगर, मेरा सलाम कबूल कर !'' 

पोर्तुगीज राजवटीतून गोवा १९६१ साली मुक्त झाला तेव्हापासून गोव्याची राजधानी पणजी  (Panaji)  या अधिकृत नावाने ओळखली जाऊ लागली, सरकारी ऑफिसांवर, कागदपत्रांत पणजी हेच नाव देवनागरी आणि इंग्रजीत म्हणजे रोमन लिपीत लिहिले जाते.

मात्र आजही गोव्यातल्या इंग्रजी दैनिकांनी आणि अनेक नागरीकांनी गोव्याच्या या राजधानीचे नाव  Panjim  असेच राखून ठेवले आहे. 

पत्रकारितेची मी जेथे सुरुवात केली त्या नवहिंद टाइम्स या वृत्तपत्रात शहराचे नाव Panjim  असेच लिहायचे असा अलिखित नियम होता, आजही आहे. पूर्वी पोर्तुगीज भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या आणि आता इंग्रजीत प्रसिद्ध होणाऱ्या हेराल्ड ने सुद्धा शहराच्या Panjim  नावाच्या स्पेलिंगमधे बदल करण्यात ठाम नकार दिला आहे.

गोव्यात म्हापसा, मडगाव, कलंगुट  वगैरे ठिकाणी बस स्टॅण्डवर खासगी बसचे कंडक्टर कोकणी  भाषेत  ''पोणजे, पोणजे'' असे मोठ्याने ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात.  

मागे बार्देसकरांच्या इतिहासावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मी बेळगाव शहराऐवजी `बेळगावी'  हे नाव वापरले तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता.

ट्रोलिंग म्हणजे काय हे मी तेव्हा पहिल्यांदा अनुभवले.आणि मी काही मिनिटांत सीमावर्ती भागांतील लोकांच्या भावना ओळखून माफी मागून लगेचच बेळगाव अशी  दुरुस्ती केली होती.

आज अहमदनगरचा ५३१ वा स्थापनादिन ! आमचे कुटुंब मूळचे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले पण माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचा. मी महाराष्ट्र सोडून गोव्याला गेलो १९७७ ला,  तोपर्यंत अहमदनगर हे शहर अहमदनगर म्हणूनच ओळखले जायचे.

१९९०च्या दशकात मी महाराष्ट्रात परतलो तेव्हा या जिल्ह्यात नव्यानेच सुरु झालेल्या दैनिकांच्या आवृत्त्यांनी अहमदनगर या शहराचे `नगर' असे `सुटसुटीत'  नाव ठेवले आहे असे मला दिसले.

विशेष म्हणजे मराठीतील सर्व प्रमुख दैनिकांनी अगदी `एकमताने' या शहराचे असे नामकरण केले आहे.

म्हणजे गोव्यात जशी परिस्थिती आहे त्याच्या अगदी उलट.

आज अहमदनगरच्या स्थापनेनिमित्त सोशल मिडियावर लिहिणाऱ्या म्हणजे आनंद शितोळे, अनुपमा निरंजन उजगरे वगैरेंनी मात्र या शहराचा उल्लेख अहमदनगर असाच केला आहे हे विशेष. 

`काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर' असे आनंद शितोळे यांनी वर्णन केले आहे.

अहमदनगर हे मलिक अंबर, चांदबिबीचे शहर, इथेच संभाजीपुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या तुरुंगात होते, इथेच औरंगजेबाचा मृत्यू  झाला, 

इथेच तुरुंगात असताना पंडित नेहरुंनी `डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 

इथले भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी स्थापलेले अहमदनगर कॉलेज हे या जिल्ह्यातील पहिले उच्च शिक्षणाचे केंद्र. अहमदनगर शहर हे ख्रिस्ती मिशनरींच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे महत्त्वाचे केंद्र.

अमेरिकन मिशनच्या मिस सिंथिया फेरार यांनी मुलींच्या शाळा येथे सुरु करुन स्त्री शिक्षणाबाबत अत्यंत महत्त्वाचे कार्य येथे केले. 

या शहरात मुक्काम करण्याचा मला कधी  योग आला नाही.  माझ्या  प्रवासाची वाट मात्र कायम या शहरातूनच राहिलेली आहे हे मी कधीही विसरत नाही.      

``ऐ मेरे अहमदनगर,

मेरा सलाम कबूल कर !''

असे  अनुपमा निरंजन उजगरे यांनी लिहिले आहे.

माझ्या भावना अगदी अशाच आहेत.