Did you like the article?

Showing posts with label Fr Stan Swamy. Show all posts
Showing posts with label Fr Stan Swamy. Show all posts

Tuesday, August 3, 2021

 

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. 
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • ‘सोसायटी ऑफ जेसुईट’चा लोगो आणि फादर स्टॅन स्वामी
  • Fri , 30 July 2021
  • पडघमसांस्कृतिक‘सोसायटी ऑफ जेसुईटSociety of Jesusफादर स्टॅन स्वामीStan Swamy

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. ‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते. यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

..............................................

या महिन्यात ‘सोसायटी ऑफ जेसुईट’ किंवा ‘जेसुईट’ (येशूसंघ) या कॅथॉलिक धर्मगुरूंच्या संस्थेचे नाव अचानक भारतातील आणि जगातील प्रसारमाध्यमांत चर्चेला आले. नजीकच्या काळातही काही संघटनांनी चालू केलेल्या आंदोलनामुळे या संस्थेचे नाव चर्चेत राहील अशीच चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे झारखंडमध्ये आदिवासी समाजात काम करणारे आणि ‘दहशतवादी’, ‘अर्बन नक्सल’, ‘माओवादी संघटनां’चे हस्तक वगैरे आरोपांखाली तुरुंगात डांबलेले ८४ वर्षांचे फादर स्टॅन स्वामी न्यायालयाकडून जामिनाची वाट पाहत अखेरीस निधन पावले.

फादर स्टॅन स्वामी या जेसुईट संस्थेचे सदस्य होते.

आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरू आहेत.

सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर आणि इतर सहकाऱ्यांसह  १५४० साली ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची स्थापना केली आणि कॅथोलिक चर्चमध्ये ‘सुधारणा युग’ सुरू केले असे म्हणतात. सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला (१४९१- १५५६) यांचा सण ३१ जुलै रोजी असतो. जेसुईटांच्या सर्व संस्थांत आणि शाळा-कॉलेजांत हा सण नाताळ आणि ईस्टरच्या खालोखाल मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.   

जुना गोवामध्ये बाँम जेजू बॅसिलिका येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे अवशेष अजूनही जपून ठेवले आहे. तीन डिसेंबरला सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या सणानिमित्त तिथं मोठी यात्रा भरते. या दिवशी गोवा सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

कॅथोलिक चर्च ही जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. तिचे जाळे जगभर अगदी वरपासून म्हणजे रोमस्थित धर्मप्रमुख पोप यांच्यापासून थेट गावपातळीपर्यंत पोहचलेले असते. चर्च ही संघटना आपल्या डायोसिसन आणि रिलिजियस धर्मगुरूंच्या आणि नन्सच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असते. कॅथोलिक चर्चसारखे संपर्काचे आणि कार्याचे सर्वदूर जाळे असणारी जगात दुसरी कुठलीही संस्था नसावी.

कॅथोलिक चर्चमध्ये दोन प्रकारचे धर्मगुरू असतात- सेक्युलर आणि रिलिजियस. एका विशिष्ट डायोसिस म्हणजे धर्मप्रांतात काम करणाऱ्या धर्मगुरूंना डायोसिसन किंवा धर्मप्रांतीय धर्मगुरू म्हटले जाते. डायोसिसन धर्मगुरूंना ‘सेक्युलर धर्मगुरू’ असेही म्हटले जाते. प्रत्येक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप असतात आणि डायोसिसन धर्मगुरू हे या बिशपांच्या अखत्यारीत आणि त्या धर्मप्रांताच्या हद्दीत काम करत असतात. पुणे धर्मप्रांतात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश होतो.   

त्याशिवाय चर्चमध्ये विविध किंवा विशिष्ट कार्यांना स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मगुरूंच्या रिलिजियस संस्था-संघटनाही आहेत. त्यांच्या सदस्यांना ‘रिलिजियस धर्मगुरू’ म्हटले जाते. त्यापैकीच इग्नेशियस ऑफ लोयोलाने स्थापन केलेली ‘सोसायटी ऑफ जिझस’ ही संस्था. तिच्या सदस्यांना ‘जेसुईट्स’ असे म्हणतात. त्याशिवाय डॉन बॉस्को यांनी स्थापन केलेली ‘सालेशियन्स ऑफ डॉन बॉस्को’ ही धर्मगुरूंची संस्था प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करते. त्यांची शाळा-महाविद्यालये जगभर नावाजलेली आहेत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ही मदर तेरेसा यांनी स्थापन केलेली नन्सची संस्था अनाथांसाठी आणि वृद्धांसाठी काम करते.      

शक्यतो डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंचीच वरच्या बिशपपदावर नेमणूक होते. आर्चबिशप आणि  कार्डिनल ही त्यावरची पदे. जगातल्या ११०च्या आसपास कार्डिनलांमधून एकाची पोपपदावर निवड होते. रिलिजियस संस्थेने परवानगी दिल्यास रिलिजियस धर्मगुरूसुद्धा बिशप होऊ शकतात आणि पोपसुद्धा, आताच्या पोप फ्रान्सिस यांच्याप्रमाणे. अशा प्रकारे नाशिकचे पहिले बिशप थॉमस भालेराव हे रिलिजियस - जेसुईट- धर्मगुरू होते, तर पुण्याचे बिशप थॉमस डाबरे आणि वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो हे सेक्युलर - डायोसिसन - धर्मगुरू आहेत.          

मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मात नवचैतन्य आणण्यात जेसुईट फादरांनी अत्यंत मोलाची कामगिरी पाडली आहे. येशूसंघीयांना त्यामुळेच ‘चर्चचे सैनिक’ असे म्हटले गेले. जेसुईट धर्मगुरू हे अत्यंत पुरोगामी आणि शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे अनेक क्षेत्रांतील जनक मानले गेलेले आहेत. पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी व मानव आहे, असे पूर्वी मानले जायचे. त्याविरुद्ध मत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांकडे मध्ययुगीन काळात चर्चतर्फे वक्रदृष्टीने पाहिले गेले. या पार्श्वभूमीवर खगोलशास्त्रात गेली काही शतके जेसुईट धर्मगुरूंनी फार मोलाची भर घातली आहे, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटू शकते.

सम्राट अकबराने आपल्या दरबारात भिन्न धर्माच्या पंडितांना निमंत्रित केले होते. या पंडितांमध्ये त्या काळी गोव्यात असलेल्या युरोपियन जेसुईट धर्मगुरूंचाही समावेश होता. त्या वेळेस पोर्तुगीजांच्या अमलात असलेल्या गोव्यातून युरोपियन असलेले रुडाल्फ अक्वाविवा आणि त्यांचे इतर सहकारी येशूसंघीय धर्मगुरू मुघल दरबारात गेले. मुघल दरबारात १५८० ते १५८३ या काळात आणि नंतरही उपस्थित राहणारे जेसुईटस पहिल्याच युरोपियन, पाश्चात्य व्यक्ती.

सम्राट अकबराने आपल्या धर्माविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली म्हणून हे येशूसंघीय धर्मगुरू खूष होते. अकबर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करील असे त्यांना वाटले. मात्र सम्राट जलालुद्दीन अकबराने त्यांची घोर निराशा केली. मुघल सम्राटाने विविध धर्माच्या पंडितांशी चर्चा जरूर केली, मात्र यापैकी कुठलाही धर्म न स्वीकारता त्याने ‘दिने इलाही’ हा स्वतंत्र धर्म स्थापन केला!    

त्यानंतर गोव्यात कुंकोळी या गावात  पाच जेसुईटांसह इतरांच्या केलेल्या हत्येत सम्राट अकबराच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या जेसुईटांचे प्रमुख असलेल्या रुडाल्फ अक्वाविवा यांचाही समावेश होता. 

 जेसुईटांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज किंवा राजकीयदृष्ट्या असुरक्षित होण्याच्या भीतीने युरोपातील काही राष्ट्रांनी म्हणजे पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन वगैरेंनी सोसायटी ऑफ जिझसच्या कार्यावर बंदी घातली होती आणि जेसुईटांना आपापल्या देशांतून हद्दपार केले होते. यात पोर्तुगालच्या ताब्यातील गोव्याचाही समावेश होता. खुद्द कॅथोलिक चर्चतर्फे म्हणजे पोप चौदावे क्लेमेंट यांनीही १७७३ साली आदेश काढून धर्मगुरूंच्या या संस्थेवर बंदी घातली. ‘सप्रेशन ऑफ सोसायटी ऑफ जिझस’ या नावाने ही बंदी ओळखली जाते. ती पोप सातवे पायस यांनी १८१४ साली उठवली. 

श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतः गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात आणि कॉलेज जीवनात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. जेसुईट जीवन मी जगलो आहे. नंतर मी जेसुईट व्रतस्थ जीवन जगण्याचा निर्णय बदलला तरी ‘वन्स अ जेसुईट, अल्वेज अ जेसुईट’ या म्हणीची काही मित्र मला अजूनही आठवण करून देत असतातच.    

फादर थॉमस स्टीफन्स हे गोव्याच्या भूमीत पाय ठेवणारे पहिले ब्रिटिश जेसुईट. त्यांनी मराठी भाषा शिकून मराठीत ‘ख्रिस्तपुराण’ रचले आणि १६०६ साली ते छापले गेले. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीस रोमन लिपीत छापला गेलेला ‘ख्रिस्तपुराण’ हा मराठी भाषेतला पहिलावहिला ग्रंथ. पोर्तुगीजांनी गोव्यात छापण्याचे यंत्र आणले, तेव्हा देवनागरी लिपीत छापणे शक्य नसल्याने हे ‘ख्रिस्तपुराण’ रोमन लिपीत प्रसिद्ध झाले. पुण्यात प्रसाद प्रकाशनाच्या य. गो. जोशी यांनी अहमदनगरचे शांताराम बंडेलू-संपादित ‘ख्रिस्तपुराण’ १९५६ साली देवनागरी लिपीत प्रसिद्ध केले. 

भारतात शिक्षणक्षेत्रात जेसुईट्स फादरांचे फार मोठे योगदान आहे. मुंबईचे झेव्हियर कॉलेज, जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यातल्या लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट स्कूल या दोन नामवंत शाळा येशूसंघीय धर्मगुरूच चालवतात.  

पुण्यात अहमदनगर रोडवर रामवाडी येथे डी नोबिली कॉलेज यासारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे थियॉलॉजी कॉलेज जेसुईट संस्था चालवते. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या १९८६च्या भारत भेटीत या संस्थेला भेट दिली होती.

‘गरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा’ ही तीन व्रते जेसुईट व्रतस्थांना घ्यावी लागतात. कुठल्याही जेसुईटाला स्वतःचे घर व मालमत्ता राखता येत नाही. जेसुईट होणे ही प्रक्रिया साधीसुधी नसते, यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन तत्त्वज्ञान, ईशज्ञान वगैरे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यामुळे यात गळतीचे प्रमाण प्रचंड असते.     

महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत जेसुईट्स धर्मगुरूंच्या कार्यांचा, मिशनरी व्रताचा आणि नि:स्वार्थ सेवापद्धतीचा फार गाढा प्रभाव पडला आहे. जेसुईटाचे अनेक क्षेत्रांत चाललेले काम जवळून पाहिले म्हणजे ‘मिशनरी सेवावृत्तीने काम’ असे का म्हटले जाते, ते कळते.  

महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना केली तेव्हा या संस्थेच्या घटनेसाठी त्यांनी ‘सोसायटी ऑफ जिझस’ या संस्थेची घटना आधारभूत मानून आपल्या संस्थेसाठी तशी कार्यपद्धती स्वीकारली. पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मानधन, पगारी सेवा यांविषयी अनेकदा वाद होई, याचे कारण म्हणजे  संस्थेच्या विश्वस्तांनी संन्याशी असलेल्या जेसुईटांच्या मिशनरी वृत्तीने सेवा करावी, असा टिळकांचा आग्रह असायचा आणि हे विश्वस्त होते प्रापंचिक मंडळी. लोकमान्य टिळकांचे चरित्रकार नरसिंह चिंतामणी केळकर यांनी याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे.

लोकमान्य टिळक यांच्या एका इंग्रजी चरित्रात टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे उल्लेखून त्यावर एक पूर्ण प्रकरणच आहे. हे प्रकरण वाचले म्हणजे जेसुईटांचा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक  प्रबोधनावर पडलेल्या प्रभावाची कल्पना येते.        

जेसुईट्स संस्थेची कार्यपद्धती, एकत्र भोजन पद्धती आणि अविवाहित राहून नि:स्वार्थपणे सेवा करण्याची पद्धत अनेकांना भावली आहे. त्यामुळे भारतात अनेक संस्था आणि संघटनांनी आपल्या कार्यासाठी जेसुईटांचे अनुकरण केले आहे. 

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे आणि त्या खालोखाल भारतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांत आज अनेक व्यक्ती आघाडीवर काम करत आहेत. त्यापैकी अनेक जण जेसुईट संस्थांत शिकलेले असतील. अशा लोकांच्या नावाची यादी खूप मोठी असेल.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेसुईटांनी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, सोनगाव, केंदळ गावांत शाळा उघडल्या, तेव्हा स्पृश्य आणि अस्पृश्य जातींच्या मुलांसाठी पहिल्यांदाच एकत्रितपणे शिक्षण दिले जाऊ लागले होते. जेसुईट धर्मगुरू हातातली घंटी वाजवत गावातल्या मुलांना शाळेत बोलावत असत. त्याआधी खालच्या जातींतील मुलांना शाळेत येण्याचे असे आमंत्रण कुणीच दिले नव्हते.

आज स्वित्झर्लंडमध्ये शंभरीत असलेले जेसुईट फादर हार्मन बाखर यांनी महाराष्ट्रात अहमदनगर  जिल्ह्यात १९६० आणि ७०च्या दशकांत ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली होती हे विशेष. अण्णा हजारे आणि इतरांचे ग्रामविकास कार्य त्यानंतर कितीतरी वर्षांनंतरचे.        

मराठीत काही मोजक्याच नियतकालिकांनी शंभरी पूर्ण करून आजही प्रकाशन चालू ठेवले आहे. जर्मन जेसुईट धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ केंदळ या गावी ‘निरोप्या’ हे मासिक १९०३ साली सुरू केले, ते आजही जेसुईटांतर्फे पुण्यातून ‘स्नेहसदन’ येथून प्रसिद्ध होत आहे. डोरींग १९०७ साली पुण्याचे दुसरे बिशप बनले. रोमला पोप यांच्या भेटीला गेले असताना पहिले महायुद्ध सुरू झाल्याने जर्मन असल्याने त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतात परतणे अशक्य झाले. त्या काळात ‘निरोप्या’चे प्रकाशन खंडित झाले होते. महायुद्ध संपताच तोपर्यंत आर्चबिशप बनलेले डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला परतले आणि ‘निरोप्या’चे प्रकाशन पुन्हा सुरू केले, ते  अलीकडचा करोनाकाळाचा अपवाद वगळता आजतागायत सुरू आहे.   

पुण्यातील स्नेहसदन या आंतरधर्मीय संशोधन केंद्राचे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले हेसुद्धा जेसुईट होते. पुणे शहराच्या साहित्य, सांस्कृतिक, रंगभूमी, वैचारिक, शैक्षणिक वगैरे अनेक क्षेत्रांत ‘स्नेहसदन’ने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

जेसुईट संस्थेच्या धर्मगुरूंचे कार्य नेहमीच मूलभूत स्वरूपाचे राहिलेले आहे. ते नेहमी नाविन्याच्या शोधात असतात. त्यासाठी आपण बांधलेली मोठीमोठी मंदिरे, नावाजलेल्या शाळा-संस्था वगैरे सर्व स्थानिक बिशपांच्या धर्मप्रांताकडे, डायोसिसन वा सेक्युलर धर्मगुरूंकडे सोपवून ते नव्या वाटा, नवे आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठलेही पाश मागे न ठेवता तेथून चक्क निघून जातात, तेथे मालक म्हणून पुन्हा कधीही न येण्यासाठी.

अशा प्रकारची नि:स्वार्थी सेवा आणि मिशनकार्य दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. पुण्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक चर्चेस आणि शाळा-संस्था जेसुईटांनी स्थापन केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक सर्व आता डायोसिसन धर्मगुरूंकडे सोपवण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात माझी एक कटू आठवण आहे. हरेगावचे मोठे शिखर असलेले टोलेगंज संत तेरेजा चर्च जर्मन जेसुईट फादर जॉन हाल्दनर यांनी १९६०च्या दशकात बांधले. सप्टेंबर महिन्यात भरणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी हे तीर्थक्षेत्र आज ओळखले जाते. या यात्रेनिमित्त जेसुईटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘निरोप्या’च्या स्टॉलला मी अनेकदा मदत करत असतो. हरेगाव धर्मग्राम आता जेसुईटांकडे नाही, तर डायोसिसन धर्मगुरूंकडे आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे आयोजकांचे उत्पन्नाचे मोठे साधन, हे आता सर्वच धर्मांबाबत झाले आहे. इथेही तो अपवाद नाही.

तर ‘निरोप्या’च्या स्टॉलवर येऊन दीडशे रुपयांची पावती फाडावी, अशी मागणी तेथील स्थानिक डायोसिसन धर्मगुरूने आमच्याकडे केली. चर्चची ती भलीमोठी जागा, तेथील शाळा आणि शेतजमीन ही सर्व जेसुईटांच्या कठोर श्रमांची कमाई… पण जेसुईटांच्या मासिकाच्या दोन दिवसांच्या स्टॉलसाठी फी मागितली जात होती. त्या वेळी मला त्या धर्मगुरूचा राग आणि कीवसुद्धा आली.

ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी म्हटले की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, धर्मांतर करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. जेसुईट धर्मगुरू शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात, पण यापैकी अनेकांनी ना कुणाचे धर्मांतर केलेले असते, ना कुणाचा बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देण्याचे, लग्न लावण्याचे अधिकार फक्त पॅरीश प्रिस्टला म्हणजे चर्चमधील धर्मगुरूंना असतात. 

गेली काही दशके अनेक राष्ट्रांत काम करणारे जेसुईट आणि इतरही कॅथोलिक धर्मगुरू स्थानिक शोषित, पिडीत आणि गांजलेल्या समाजघटकांच्या बाजूने उभे राहत आहेत. लॅटिन अमेरिकेतील तसेच तिसऱ्या जगातील अनेक देशांत ‘मुक्तीचे ईशज्ञान’ (‘लिबरेशन थियॉलॉजी’) या संज्ञेने आणि चळवळीने कॅथॉलिक धर्मगुरूंमध्ये खूप मूळ धरले आहे. सत्ताधारी आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ‘लिबरेशन थियॉलॉजी’ लढा पुकारते. अनेकदा यापैकी अतिउत्साही, मार्क्सवादाशी जवळीक करणाऱ्या  धर्मगुरूंना वेसण घालणे कॅथोलिक चर्चला भाग पडले आहे.        

मुंबईतील झेव्हियर कॉलेजात इतिहास शिकवणाऱ्या स्पॅनिश धर्मगुरू हेन्री हेरास यांचे प्राच्यविद्याशास्त्र (इंडॉलॉजी) विषयातील संशोधन महत्त्वाचे मानले जाते. फादर कामिल बुल्के हे  बेल्जीयन जेसुईट धर्मगुरू हिंदी भाषेत डॉक्टरेट मिळवणारी पहिली व्यक्ती. अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’  या प्रबंधावर ही पदवी मिळवली. फादर बुल्के यांनी ‘इंग्रजी- हिंदी शब्दकोश’ तयार केला. त्याशिवाय ‘तुलसीरामायणा’वरील त्यांचे संशोधन आजही पायाभूत स्वरूपाचे मानले जाते. 

भारतातील अनेक राज्यांतील, विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतील अनेक भाषांत जेसुईटफादरांनी मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. रॉबर्ट डी नोबिली (१५९७-१६५६) हे जेसुईट धर्मगुरू संस्कृत आणि तामिळ भाषेचे पंडित होते. त्यांनी संस्कृत भाषेतील अभिजात साहित्याची पाश्चात्य जगाला पहिल्यांदाच ओळख करून दिली असे म्हणतात. फादर थॉमस बेस्ची (१६८०-१७४७) यांनी लिहिलेले ‘तंबोवाणी’ काव्य हे तामिळ भाषेतील एक अभिजात साहित्य मानले जाते.      

गेली काही वर्षे अफगाणिस्तानात स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी तालिबानींच्या दहशतीची पर्वा न करता पुण्यातील फादर स्टॅन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील जेसुईटांची एक तुकडी ‘जेसुईट रेफ्युझी सर्व्हिस’ अंतर्गत तेथे काम करत होती, हेही इथे आवर्जून सांगायला हवे. त्यापैकी एक केरळचे जेसुईट फादर अलेक्सीस प्रेम कुमार यांचे २०१५ साली अपहरण झाले होते आणि भारत सरकारच्या मध्यस्थीने त्यांची नंतर सुटका झाली.

जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट सर्वोच्च अधिकारी सुपिरियर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.

अर्तुरो सोसा हे सोसायटी ऑफ जिझसचे सध्याचे सुपिरियर जनरल आहेत. २०१६ साली व्हेनेझ्युला या देशाच्या सोसा यांची या पदावर निवड झाली तेव्हा `मिशी असलेले' सुपिरियर जनरल म्हणून प्रसारमाध्यमांने त्यांची दखल घेतली. कारण म्हणजे पाश्चात्य देशात दाढीमिशा ठेवण्याची प्रथा असली तरी फक्त मिशा सहसा कुणी ठेवत नाही. मिशाधारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, किंवा पोप अशी कल्पना करुन बघा.

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. 


चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!

जेसुईट असलेले सध्याचे पोप फ्रान्सिस आणि जेसुईट संस्थेचे सुपिरियर जनरल यांच्या नाते कसे असेल? जेसुईट संस्थेच्या मेळाव्यात पोप फ्रान्सिस हे आयुष्यभर एक सामान्य जेसुईट असतील, मात्र जेसुईट सुपिरियर जनरल पोप यांना चर्चच्या कारभाराविषयी कुठलाही आदेश देऊ शकत नाही. 


ख्रिस्ती (कॅथोलिक वा प्रोटेस्टंट) धर्मगुरु आपल्या नेहेमीच्या झग्यात नसले कि ते आपल्या कॉलरभोवती पांढऱ्या रंगाची पट्टी अडकवतात. या पट्टीला 'रोमन कॉलर' असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मगुरुंना ओळखण्याची ही एक खूण. इंग्रजी चित्रपटांत अनेकदा धर्मगुरू असेच दिसतील



या फोटोतील जेसुईट सुपिरियर जनरल सोसा आणि इतर धर्मगुरूंनी रोमन कॉलर लावली आहे.