Did you like the article?

Showing posts with label Dada Kondke. Show all posts
Showing posts with label Dada Kondke. Show all posts

Thursday, September 15, 2022

तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींबद्दल ना अभिमान आहे, ना न्युनगंड. 
 


``आजवर सगळ्या अभिनेत्यांनी `नटसम्राट'मधील गणपतराव बेलवळकरांची मुख्य भुमिका साकारलेली सगळी नाटकं मी पाहिली आहेत. अगदी थेट डॉ. श्रीराम लागू यांच्यापासून..'' 
 
नाना पाटेकर यांचा `नटसम्राट' चित्रपट मी पाहून आल्यावर आमच्या इमारतीत राहणाऱ्या एका शेजाऱ्याशी याविषयी बोलत असताना त्यांचं हे वरचं वाक्य ऐकलं तेव्हा मी थक्क झालो होतो. 
 
नाना पाटेकरांच्या `नटसम्राट' विषयी बोलताना '' दत्ता भट आणि शांता जोग यांच्या भूमिका असलेलं 'नटसम्राट' नाटक मी पाहिलं आहे' असं त्यांना मी सांगितल्यावर ``आपण सर्वच अभिनेत्यांनी नटसम्राट गणपतराव बेलवळकरांची भूमिका साकारलेली नाटकं पहिली आहेत'' अशी माहिती त्यांनी पुरवली होती. 
 
हे सद्गृहस्थ तसे माझे समवयस्क, दोनतीन वर्षांनी मला लहानच. ही सर्व नाटकं आपण लहानपणी आणि पुण्यात नंतर कॉलेजात असताना पाहिली होती असं त्यांनी मला सांगितलं आणि मी अंतर्मुख झालो. आम्ही दोघे जवळजवळ एकाच वयाचे असलो तरी आमच्या अभिरुचिंत आणि सवयींमध्ये किती फरक होता ! 
 
श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या आईवडलांसह आणि भावंडांबरोबर पाहिलेलं पहिलं नाटक मला आजही आठवतं. `स्वयंसिद्धा' नाव असलेलं हे नाटक नायिकाप्रधान होतं. आणि त्या नाटकाच्या अखेरच्या भागात नायिका चाबूक घेऊन तिचा छळ करणाऱ्या कुटुंबातील एकाचा समाचार घेते अशी कथा होती. बाजारतळापाशी असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या `ओपन थिएटरमध्ये लोखंडी खुर्च्यांवर बसून (शेवटी असलेल्या भारतीय बैठकीत नाही ) आम्ही हे नाटक पाहिलं होतं.
 
`नटसम्राट' हे मी आमच्या कुटुंबियांसह पाहिलेलं दुसरं आणि अगदी शेवटचं नाटक. त्यानंतर आमच्या घरातले कुणीही नाटकांच्या वाटेला गेलं नव्हतं. 
 
त्याऐवजी मग आम्हा सर्वांना हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याची सवय लागली. वसंत टॉकीज, किशोर टॉकीज यानंतर श्रीरामपूरात रेल्वेपलिकडॆ नवं लक्ष्मी थिएटर सुरु झाले होते. दिलीप कुमारचा डबल रोल असलेला `राम और श्याम' हा तिथं लागलेला पहिला सिनेमा. त्याकाळात हिंदी आणि मराठी चित्रपट अनेक आठवडे चालत. पहिली काही आठवडे या चित्रपटांची तिकिटे ब्लॅकने विकत घ्यावी लागायची किंवा तिकीट खिडकी उघडण्याच्या वेळेआधी काही तास तिथं कुणालातरी रांगेत राहावं लागायचं. प्रत्येकाला फक्त दोन तिकिटं मिळायची, लेडीज लाईन वेगळी असायची पण लेडीज लाईन तशी मोकळीच. 
 
त्याकाळात सुनील दत्त आणि नूतन यांची, सिल्व्हर ज्युबिली हिरो म्हणून नाम कमावलेल्या राजेंद्र कुमारची, शम्मी कपूरची, आणि शशी कपूरची अनेक हिट फिल्म्स आईवडिलांसह मी पाहिली, रेडिओवर या सिनेमांतली गाणी सतत ऐकून आतापर्यंत तोंडपाठ आहेत. 
 
दादा कोंडके यांची `सोंगाड्या’ या चित्रपटापासून नंतर आलेले `पांडू हवालदार’, `एकटा जीव सदाशिव’ अशी सुरुवातीची काही सिनेमे अशीच कुटुंबियांसह पाहिली. दादा कोंडके नंतर द्विअर्थी सिनेमा शिर्षकांकडे आणि संभाषणाकडे वळाले तेव्हा त्यांची सिनेमे पाहणे एकदम बंद झाले. 
 
लहान असल्याने एकट्याने किंवा मित्रांसह पाहणे शक्यच नव्हते. व्ही शांताराम यांचा `पिंजरा' असाच पाहिला. डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा `सामना' सुद्धा पाहिला, त्यावर नंतर पणजीतल्या आमच्या धेम्पे कॉलेजाच्या वार्षिक अंकात परीक्षण सुद्धा लिहिलं, 
 
'आराधना' सिनेमानंतर राजेश खन्ना याचा चढता काळ सुरु झाल्यानंतर मात्र मोठ्या भावांबरोबर हे सिनेमे पाहिले. राजेश खन्नाचा कुठलाही सिनेमा सोडायचा नाही असा त्याकाळी आमचा नियमच होता. 
 
त्याकाळात सर्व घरांघरांत अशीच परिस्थिती होती. अगदी गरीब कुटुंबातील लोकसुद्धा शेवटच्या रांगेतले तिकिटे विकत घेऊन सिनेमे पाहायचेच. त्याकाळात सिनेमा, सर्कस हीच करमणुकीची साधने होती. 
 
आमच्या घराशेजारी असलेल्या बाजारतळापाशी शुक्रवारी आठवडी बाजार भरायचा, त्यादिवशी तिथल्या मोकळ्या जागेवर तमाशाच फड भरायचे. त्यासाठी तिथं तंबू उभारला जायचा. घरापाशी इतक्या जवळ असूनसुद्धा घरातले कुणी किंवा नात्यातले इतकेच नव्हे तर माहितीतले कुणीही या तमाशाला जात नसत. घोगरगाव इथल्या माझ्या मामांच्या घरातले, माझे मामेभाऊ आणि इतर काही जण तमाशा पाहायला जात असावेत असं आता अधुंकसं आठवतं. तमाशा हा प्रकार ग्रामीण लोकांत लोकप्रिय होता, शहरी आणि सभ्य लोकांसाठी तमाशा म्हणजे `करमणुकीचं अश्लील साधन' अशीच भावना होती. 
 
तमाशा लोककलेचे मूळ, इतिहास, या लोककलेच्या प्रयोगांवर मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी घातलेली बंदी वगैरे काही घडामोडी आणि या लोककलेचे सामाजिक स्थान यावर मी एक मोठा लेख लिहिला आहे, पण खूप वर्षांपूर्वी कुठेतरी एकदाच मी तमाशाच्या प्रयोगाला हजर होतो. 
 
आमची संपूर्ण चाळ कुडाच्या भिंती असलेल्या आणि वर पत्र्यांचे छप्पर असलेल्या घरांची होती. आमच्या भिंतीला लागून एका बाजूला मुसलमान शेजार तर दुसऱ्या बाजूला मराठा शेजार होता आणि त्याला लागून दुसरं एक मुसलमान कुटुंब होते. अगदी समोर दुसरे मुसलमान कुटुंब आणि बाकी सगळे शेजारी माळी होते. 
 
हा सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची. या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं आजही आठवतं. 
 
नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती. ख्रिस्ती धर्माचा प्रसार बिगरयहुदी लोकांमध्ये होऊ लागला तेव्हा ख्रिस्ती धर्मातही सुंता परंपरा असावी कि नाही यावेळी बराच उहापोह झाला होता. सेंट पॉल याने ही सामाजिक रीत ख्रिस्ती धर्मियांचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही असे मत दिल्यावर या चर्चेवर पडदा पडला होता. 
 
ख्रिस्ती धर्मांतलं हे इतरांशी मिळतंजुळतं घेणारं अगदी पहिलं सांस्कृतिकरण किंवा Inculturation म्हणावं लागेल ! 
 
दैनंदिन घनिष्ट संबंध असणाऱ्या या कुठल्याही शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरांत मुंज, मंगळागौर असे कार्यक्रम नसायचे. अशा प्रथा असणारे लोक शेजारी असंणाऱ्या दगडी बांधकामाच्या घरांत किंवा इमारतींत राहत असत. 
 
मुसलमान शेजाऱ्यांच्या आणि मित्रांच्या लग्नसमारंभांतल्या आणि इतर कार्यक्रमांतल्या जेवणाची विशेषतः मटणाच्या लाल रस्सा असलेल्या चमचमीत कालवणाची आणि मसालेदार बिर्याणीची सगळेजण नंतर अनेक दिवस तारीफ करत असायचे. 
 
या सगळ्यांचा जातधर्म वेगळा असला तरी या सर्वांचा आर्थिक थर , शिक्षणाची पातळी एकच होती, प्रगतीच्या बाबतीत सगळेच जण धडपडत होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सामाजिक अथवा सांस्कृतिक असमानता अशी नव्हती. 
 
आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानात पुण्यात छापलं जाणारं `सकाळ' हे दैनिक यायचं, त्याशिवाय `स्वराज्य' आणि नाशिकचं सत्यवान नामदेव सूर्यवंशी संपादित 'आपण' साप्ताहिक यायचं, चांदोबा मासिक आम्हा मुलांसाठी. मात्र आसपासच्या सर्वच सुशिक्षित लोकांना कुठेही, न्हाव्याच्या दुकानांत, हॉटेलांत, गल्लीबोळांतील सार्वजनिक वाचनालयांत दैनिकं, साप्ताहिकं दिसली कि वाचायची सवय होती. 
 
जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले आणि गोव्याला आलो तेव्हा मराठी आणि हिंदी सिनेमे पाहणे एकदम बंद झाले. त्याऐवजी इंग्रजी चित्रपट पाहणे सुरु झाले. विशेष म्हणजे मिरामार इथल्या आमच्या प्री-नॉव्हिशिएटमध्ये चित्रपट पाहिल्यावर त्यावर आम्हा तरुणांमध्ये विविध अंगांमधून चर्चा व्हायची. 
 
आमचे जेसुईट सुपिरियर फादर इनोसंट पिंटो आम्हाला चित्रपटांचे रसग्रहणं कसे करावे याबाबत मार्गदर्शन करायचे. या चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच चित्रपट आम्ही पुन्हा पाहायचो. यालाच फिल्म अप्रेसिएशन म्हणताच असं नंतर कळालं. रॉबिन्सन क्रुसो, बेनहर, टेन कमांडमेंट्स, टू सर विथ लव्ह, असे कितीतरी सिनेमे आणि अकिरा कुरोसावा यांचे विविध चित्रपट याकाळात आम्ही पाहिले. 
 
आजही टिव्हीवर इंग्रजी चित्रपट पाहण्याकडेच माझा अधिक कल असतो. अर्थात खूप वर्षांपासून टिव्हीसमोर बसणे मी टाळत असतो तो भाग वेगळा. 
 
गोमंतकातील हिंदू समाजातून देशातील अभिजात संगीत आणि गायन क्षेत्रांत खूप मोठे योगदान दिलं आहे, मात्र कॅथोलिक समाजातील एकाही व्यक्तीचे याबाबत नाव घेता येणार नाही. गोव्यात अशी सरळसरळ विभागणी होत असते आणि त्याला विविध कारणं आहेत, गोव्यात अनेक कॅथोलिक घरांत एकतरी मुलगा किंवा मुलगी गिटार वाजवत असते आणि जवळजवळ सर्वच मुलं शाळेत आणि शाळेबाहेर फ़ुटबाँल खेळात असतात. गोव्यातल्या कॉलेज जीवनात मीसुद्धा फ़ुटबाँल खूप खेळलो. 
 
पुण्यात `इंडियन एक्सप्रेस’ला रुजू झालो तेव्हा काही महिन्यांतच विजय तेंडुलकरलिखित आणि मोहन आगाशे यांची भूमिका असलेले 'घाशीराम कोतवाल' हे नाटक पाहिलं. सतीश आळेकर लिखित `बेगम बर्वे’ हे नाटकसुद्धा पाहिलं. गोव्यातली कॉलेजेस तेव्हा मुंबई विद्यापीठाशी संलग्न होती. आमच्या बीए अभ्यासक्रमात मराठी विषयात पु ल. देशपांडेंचं 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक होतं. पुण्यात हे नाटकसुद्धा भरत नाट्य मंदिरात पाहिलं. 
 
`इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाच्या आम्हा बातमीदारांनी ही मराठी नाटकं पहिली ती आमचा बातमीदार सहकारी माधव गोखले याच्यामुळं. इतर बातमीदारांमुळं `अलका थिएटर' आणि कॅम्पातल्या वेस्ट एन्ड थिएटरला भरपूर इंग्रजी सिनेमे पाहिले. शेवटी संगत सुद्धा महत्त्वाची असतेच. 
 
लग्नानंतर पिंपरी चिंचवडला स्थायिक झालो, इथं घरापासून दीडशेदोनशे मीटर अंतरावर महापालिकेचं रामकृष्ण मोरे सभागृह आहेत तिथं अगदी वर्षभर नाटकं आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मी तिथं फक्त दोनदाच नाटकाला पत्नीसह गेलो होतो. योगायोगानं दोन्ही नाटकांत भक्ती बर्वे याच मुख्य भूमिकेत होत्या. यापैकी एक नाटक होतं भक्ती बर्वे यांनी दुसऱ्यांदा भूमिका केलेलं पु. ल. देशपांडे यांचं 'ती फुलराणी' आणि दुसरं नाटक होतं ' आई रिटायर होते' 
 
बस्स. माझं मराठी नाटकप्रेम इतकंच राहिलंय. मी पाहिलेली नाटकं केवळ दोन्ही हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी आहेत. 
 
नव्व्दच्या दशकाच्या अगदी सुरुवातीस भाऊ महाराज बोळात राहणाऱ्या पत्रकार मित्र पराग रबडे याच्या नादाने मी सवाई गंधर्व फेस्टिव्हलचे सिझन तिकीट काढले आणि रमणबाग शाळेच्या मैदानात पूर्ण रात्रभर चालणाऱ्या त्या संपूर्ण संगीत महोत्सवाला मी हजेरी लावली. यावेळी उस्ताद झाकिर हुसेन, पंडित हरिप्रसाद चौरासिया, बेगम परवीन सुलताना, गंगुबाई हंगल, पंडित जसराज, सरोदवादक अमजद अली खान, संतूरवादक शिवकुमार शर्मा वगैरे दिग्गजांना पाहण्याची अन त्यांचे त्यांच्या क्षेत्रांतले कसब पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मला मिळाली. 
 
शेवटच्या दिवशी किंवा भल्या पहाटे पंडित भीमसेन जोशी यांना पूर्णवेळ ऐकले. अर्थात संगीताच्या कुठल्याही क्षेत्रातले मला काही काळात नाही मात्र आपण काहीतरी दिव्य, अद्भुत अनुभवत आहोत याची मात्र मला पूर्ण जाणीव होती. 
 
दाद देण्याची पध्दत वेगवेगळी असते. आपल्याकडं केवळ टाळ्याच असतात. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी बल्गेरियात असताना तिथे वेगवेगळ्या शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असायचो. तिथं व्हायोलिन, पियानो वगैरे वादकांनी आपले संगीतवादन संपवलं कि प्रेक्षागृहातले सर्व प्रेक्षक कितीतरी वेळ उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत, टाळ्या संपत नाही तोपर्यंत त्या कलाकाराने विविध दिशांकडं पाहत न कंटाळता कमरेपर्यंत झुकत त्या प्रतिसादाचा स्वीकार करत 
 
एखाद्या पूर्ण संगीत महोत्सवाला उपस्थित राहण्याची ही माझी पहिलीच आणि आतापर्यंतची एकमेव घटना. 
 
काही वर्षांपूर्वी आदितीमुळं घरात एक मोठा किबोर्ड आला आहे, तिच्यामुळं मीसुद्धा तो शिकण्याचा क्लास लावला आणि जिंगल बेलसारखी काही गाणी आणि चर्चमधली काही गायनं मला आता वाजवता येतात, अर्थात हे वादन असतं स्वान्तसुखाय, फक्त स्वतःसाठी ! 
 
पुण्यात जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' आश्रमात कुठलासा कार्यक्रम होता त्यावेळी झालेली ही घटना. `स्नेहसदन'चे संस्थापक जर्मन फादर डॉ मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून येथे एक भलीमोठी समई विविध प्रसंगी वापरली जाते. 
 
`स्नेहसदन'मध्ये गेल्यागेल्या पहिल्यांदा दारासमोरच असलेल्या या समईचेच दर्शन घडते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला समई प्रज्वलन करायचे होते. मी पुढे आलो तेव्हा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मला आधी पायांतले बूट काढण्याची सूचना केली आणि समई पेटवण्याची शिष्टसंमत पद्धतसुद्धा सांगितली 
 
ही प्रथा मला माहित असणं शक्यच नव्हते. 
 
आमच्या घरात समई कधीही नव्हती, दररोज रात्रीच्या अर्धा तास चालणाऱ्या कौटुंबिक प्रार्थनेआधी अल्तारावर दोन मेणबत्त्या पेटवल्या जायच्या. आमच्या घरात अगरबत्तीची पाकिटे दिवाळीच्या वेळी फक्त फटाके फोडण्यासाठीच यायची. 
 
आणि ही मागच्या आठवड्यातली घटना. स्वतःसाठी वाढून जेवायला बसलो होतो. मी स्वतःच स्वयंपाक केला होता. ताटात भात घेतला, त्यावर वरण टाकलं आणि आणि एकदम आठवलं. सकाळी मेथीचे पराठे बनवल्यावर जॅकलीनने त्यावर तुपाची हलकीशी धार सोडली होती. मी लगेच तुपाची ती बरणी घेतली आणि चमच्यानं ते तूप गरमागरम भातावर टाकलेल्या वरणावर टाकलं. खरं तर थोडं जास्तच टाकलं (हे नंतर खाताना लक्षात आलं ) आणि मग जेवण केलं. 
 
लहानपणी आमच्या घरी आणि तांदूळ पिकत नाही अशा अनेक ठिकाणी भात फक्त सणासुदीलाच म्हणजे पुरणपोळी, आमटी आणि भाजी कुरडया असं जेवण असल्यावर व्हायचा किंवा कुणी आजारी असलं तर हलका आहार म्हणून भात शिजला जायचा. दररोजच्या जेवणात भातावर साजूक तूप आणि लिंबाची फोड असा थाट केवळ पुस्तकात वाचला होता. 
 
हा, पुरणपोळी, गुळवणी वगैरे असल्यावर त्या दिवशी दुकानातून थोडं तूप आणलं जायचं आणि गरमागरम गुळवणीवर तुपाची धार सोडली जायची हे मात्र आठवतं. गुळवणी म्हणजे गुळापासून बनवलेला गरमागरम पातळ रसा. 
 
तर त्यादिवशी स्वतः भात आणि वरणावर तूप टाकून जेवल्यावर जाणवलं, आमच्याकडं ही प्रथा कधीच नव्हती ! 
 
भात वरण आणि लिंबाच्या फोडीवरुन आठवलं. पूर्ण वेळ सेवेत असणारे दोन पत्रकार दुपारी नेमकं दोन ते चारपाच या वेळात कार्यालयात नसायचे. संपादकांनी खूप प्रयत्न करून आणि फतवे काढून, धमक्या देऊन सुद्धा या बाबतीत काही सुधारणा झाली नाही. काही कार्यक्रम किंवा एखादी घटना असली तरच हे दोन्ही पत्रकार महाशय हजर असायचे. कामावर येताना संपादक आणि आमच्या सारखी मंडळी बरोबर डबा आणायची तसं त्यांनीही करावं असा आदेश दोघं झुडकावून लावत असत. 
 
त्यावेळी हे दोघे `दुपारच्या भात वरण, त्यावर तुपाची धार आणि लिंबाची फोड’ या जेवण्याच्या मेंन्यूबाबत आणि त्यानंतरच्या वामकुक्षीबाबत आग्रही असल्यानं ऑफिसात जेवणाचा डबा आणत नाही असं संपादकांनी भर मीटिंगमध्ये म्हटल्याचं आठवतं. 
 
यावरुन गोव्यातील खाद्यसंस्कृतीबाबत. गोव्यात शाळाकॉलेजात आणि नोकरीनिमित्त असताना आठवड्यातून दररोज दुपारी आणि रात्री केवळ बिफ असायचं, एकदोनदा मासळी असायची. मात्र बिफची एक डिश कधीही रिपीट होत नसायची, आज चिली-फ्राय, उद्या कटलेट्स, परवा बिफ स्टिक, तेरवा बटाटा (पोर्तुगीजांची देणगी) घालून करी आणि रविवारी शाकुती. दररोज दुपारी भात आणि सकाळ मऊ पाव आणि रात्री मध्यभागी चिर, वरुन कडक आणि आत मऊ असलेला उंडो पाव ! 
 
ख्रिसमस आणि ईस्टर या फेस्तांना पोर्क सोरपोतर किंवा विंदालू!
 
एक ताजा कलम म्हणजे गेली कितीतरी वर्षे या अन्नपदार्थांवरील वासना उडाल्यामुळे बिफ आणि पोर्क खाणे मी पूर्णतः बंद केले आहे, याला अपवाद फक्त माझा युरोपचा आणि इतर परदेशांतील दौरा होता. 
 
मला वाटतं ही आहे विविध जातिधर्मांच्या विविध सामाजिक, आर्थिक थरांतल्या लोकांची संस्कृती आणि कलाव्यववहार. 
 
खूपदा आपल्या शेजाऱ्यांची, मित्रांची वा कार्यालयीन सहकाऱ्यांची अशी संस्कृती आहे याची एकमेकांना जाणीवही नसते, या संस्कृतीची ओळख करुन घेण्याची इच्छा होणे तर फारच लांब राहिलं. 
 
अलीकडेच लोकसत्तानं रविवारच्या अंकांत पाच तज्ज्ञांचे संस्कृतीच्या विविध अंगांबाबत लेख छापले. या पाचही लेखांच्या लिंक्स उपलब्ध आहेत. या लेखांवरुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गेले काही दिवस मोठी धुमश्चक्री किंवा चिचारमंथन चालू आहे. विविध गट दुसऱ्या, तिसऱ्या गटाचं म्हणणं खोडून काढतायत. 
 
ही चर्चा वाचताना माझ्या लक्षात आलं कि अनेक मोठमोठी नावं घेतली जातायत, यापैकी अनेक नावं मी गेली कित्येक वर्षे नुसती ऐकूनच आहे, त्यांच्या कलाव्यवहारांकडं, साहित्याकडं आणि नाटकांकडं मी कधी वळलो नाही. याला सांस्कृतिक करंटेपणा म्हटलं तरी चालेल पण ती वस्तुस्थिती आहे. 
 
विविध क्षेत्रांतले कलाव्यवहार समाजाच्या केवळ तीनचार टक्के लोकांत चालतात असं शेवटच्या लेखात महेश एलकुंचवार यांनी म्हटलं आहे. `सर्वसामान्य माणूस व कलाव्यवहार केवळ एकमेकांपासून दूरच नाहीत, तर त्यांना एकमेकांशी काही देणेघेणे नाही’ असं त्यांचं एक वाक्य आहे. साहित्यप्रकाराचा काही प्रमाणात अपवाद सोडला तर मग मी स्वतः या सामान्यजनांत मोडतो हे माझ्या लक्षात आलं. 
 
मात्र दुसऱ्याच्या चालीरिती, भिन्न मते आणि संस्कृतीबाबत आदर तर ठेवायला हवा. 
 
या विभिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींबद्दल ना अभिमान बाळगण्याची गरज आहे, ना न्युनगंड. 
 
 
Camil Parkhe, September 14, 2022