Did you like the article?

Showing posts with label Abraham Lincoln. Show all posts
Showing posts with label Abraham Lincoln. Show all posts

Wednesday, December 13, 2023

जो बायडेन नवी दिल्लीत

पृथ्वीबाहेर केवळ अवकाशातच नाही तर अगदी चंद्रावर आपले नामोनिशाण असणारी राष्ट्रे एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहेत.

विज्ञानात अशी मोठी प्रगती करणाऱ्या काही राष्ट्रांचे प्रमुख अत्यंत धार्मिकसुद्धा आहेत.
आणि प्रगत विज्ञान आणि धार्मिकता यांचा फारसा संबंध नाही.
जसा आस्तिकता आणि नास्तिकता यांचा नैतिकतेशी दुरान्वयेसुद्धा काहीएक संबंध नसतो.
चंद्रावर आपले वाहन उतरवणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचा अलीकडेच समावेश झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती धार्मिक आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
रशियाचे राष्ट्रप्रमुख ब्लादिमीर पुतिन हे सोव्हिएत रशियाच्या राजवटीत खतरनाक केजीबी संघटनेचे प्रमुख होते. त्याकाळात साम्यवादी रशियात देव आणि धर्म हद्दपार करण्यात आले होते.
रशियात सत्तेवर आल्यानंतर पुतिन हे धार्मिक बनले आहेत आणि ख्रिसमसच्या विधीला ते हजर असतात असे वाचण्यात आले होते.
रशियात आणि इतर ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती राष्ट्रांत ख्रिसमस २५ डिसेंबरला नाही तर सहा जानेवारीला असतो. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती हे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन प्रमुख पंथाबाहेरचे.
चीनचे राष्ट्रप्रमुख धार्मिक असणार नाहीत याविषयी शंकाच नको.
चंद्रावर पहिल्यांदा मानवाचे पाऊल ठेवण्याची कामगिरी खूप वर्षांपूर्वी करणाऱ्या अमेरिकेचे सद्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेसुद्धा मोदीजी यांच्याप्रमाणेच धार्मिक आहेत.
अर्थात आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याचा त्यांना सोस नाही आणि गरजपण नाही.
G-20 परिषदेच्या निमित्ताने इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे जो बायडेन नवी दिल्लीत आले आहेत.
दिल्लीत आल्याआल्या त्यांनी या महत्वाच्या परिषदेआधी एक खासगी प्रार्थनाविधी उरकून घेतला. अमेरिकेच्या भारतातील वकिलातीने त्याआधी शिरस्त्याप्रमाणे खूप दिवस पूर्वतयारी केली होती.
बायाडेन यांच्यासाठी शनिवारी खास आयोजित केलेल्या अर्ध्या तासभर चाललेल्या खासगी मिस्साविधी (Holy mass) किंवा Eucharist विषयी आज १० सप्टेंबरच्या अंकात इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे.
अमेरिका हे एक ख्रिस्ती राष्ट्र आहे असे समजले जाते. आतापर्यंत झालेले सर्व राष्ट्राध्यक्ष जन्माने ख्रिस्ती आहेत. तिथले बहुसंख्य नागरिक प्रॉटेस्टंट पंथीय आहेत, कॅथोलिकपंथीय तुलनेने कमी आहेत.
अलीकडच्या काळातले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झालेले कॅथोलिक पंथीय म्हणजे जे एफ. केनेडी, जिमी (जेम्स) कार्टर आणि आताचे राष्ट्राध्यक्ष जो (जोसेफ) बायडेन.
तर काल आयोजित केलेल्या मिस्साविधीसाठी (Eucharist) दिल्लीतल्या फादर निकोलस डायस यांना खूप आधी पूर्वसूचना देऊन तयारी करण्यात आली होती. फादर डायस हे मूळचे गोव्यातल्या बाणावली इथले.
मिस्साविधी संपल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फादर डायस यांना आपली भेट (souvenir) म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा एक अधिकृत शिक्का किंवा राजमुद्रा (नंबर २६१) भेट म्हणून दिला.
या शिक्क्यावर एका बाजूला लिहिले आहे : Joseph R Biden ; 46th President of The United States of America दुसऱ्या बाजूला लिहिले आहे: Seal of the President of the United States
फादर निकोलस डायस यांनी बायडेन यांना `बिबिन्का' या गोव्यातल्या खास खाद्यपदार्थाची भेट दिली.
Camil Parkhe,

Friday, October 8, 2021

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्नेहसंमेलन

 पुण्यातल्या चित्तरंजन वाटिकेत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या डिसेंबरात येणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत नव्यानेच सहभागी झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अमिताभ दासगुप्ता, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पराग रबडे आणि मी स्वतः त्या दिवसाच्या क्विझ कॉन्टेस्टचे आयोजन केले होते.

पत्रकारांसाठीच ही ;प्रश्न मंजुषा असल्याने बहुतेक प्रश्न प्रसार माध्यमांशी संबंधित होते. क्विझ मास्टर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव असलेल्या अमिताभ दासगुप्ता यांची क्विझ मास्टर म्ह्णून निवड करण्यात आली होती.

ही घटना आहे १९९०च्या दरम्यानची. पुण्यात इंडियन एक्सप्रेसला बातमीदार म्हणून रुजू होण्याआधी मी गोव्यात नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सरचिटणीस तसेच इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचा पदाधिकारी म्हणून मी जबाबदारी सांभाळली होती.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा सभासद झाल्यावर या संघाचा इतिहास मी नजरेखालून घातला होता. अशा सामाजिक इतिहासासाठी स्मरणिका फार उपयोगी पडतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. लेबर युनियन म्हणून या नात्याने पत्रकार संघाचे काम निराशादायक असले तरी इतर क्षेत्रांत या पत्रकार संघाने चांगले काम केले होते.

तर स्नेहभोजनाआधी होणाऱ्या या क्विझ कॉन्टेस्टसाठी मी काही प्रश्नांचो निवड केली होती. अमिताभ दासगुप्ता कार्यक्रमाचे अँकरिंग आपल्या खुमासदार शैलीत करत होते आणि त्यामुळे जमलेली पत्रकार मंडळी खूष होती. खूप वर्षानंतर असा खेळीमेळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे काही जणांचे मत होते.

गोव्यातून पुण्यात आल्यानंतर पत्रकार संघाच्या पुढील निवडणुका नजरेसमोर ठेवून गेल्या काही महिन्यांत मी जोरदार सभासद मोहिम हाती घेतली होती. या सभासद मोहिमेमुळेच त्यावर्षी मी आणि पराग रबडे आमचे पूर्ण पॅनेल पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर निवडून आणू शकलो होतो, गौरी आठल्ये यांच्या रुपाने पहिली आणि आतापर्यंत एकमेव महिला सरचिटणीस निवडून आणू शकलो होतो. केसरीचे मधुकर प्रभुदेसाई त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. नव्याने सभासद झालेल्या लोकांत तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. 

तर क्विझ मास्टरने आता विचारलेल्या प्रश्नाने त्या चित्तरंजन वाटिकेत शांतता पसरली होती. कुणालाच अगदी पत्रकार संघाच्या बुजुर्ग मंडळींना सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. पत्रकारांच्या त्या मेळाव्यात टाकण्यात आलेला त्या प्रश्नाने सगळेच चक्रावले होते. 

कारण तो प्रश्न होताच तसा. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सर्वाधिक आणि जगभर प्रसिद्ध असलेल्या कार्यकारिणी सभासदाचे नाव काय? असा तो प्रश्न होता. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेल्या समाजवादी नेते एस एम जोशी यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्याा काही पदाधिकाऱ्यांचीं नावे काही पत्रकारांना माहित होती पण त्यापैकी कुणीही जागतिक पातळीवर कधी आले नव्हते. पत्रकारांकडून उत्तर येईना, त्यामुळे क्विझ मास्टरने काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला. मानवजात असेल तोपर्यंत या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या या कार्यकारीणी सदस्याचे नाव कायम राहिल अशी अतिरीक्त माहिती पुरवल्याने तर या प्रश्नाबाबतचे रहस्य अधिकच गडद झाले. 

शेवटी याबाबत फार ताणू नये असे ठरवून क्विझ मास्टर अमिताभ दासगुप्ता यांनी प्रश्नाचे उत्तर जाहीर केले. 

त्या प्रश्नाचे उत्तर ऐकून त्या मेळाव्यात निर्माण झालेला सन्नाटा ऐकण्यासारखा होता. ते उत्तर ऐकून माझ्या पत्रकार सहकाऱ्यांची ती दीर्घकाळ टिकलेली  शांतता मला आजही आठवते. त्यापैकी कुणालाच त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नसते. राजसत्तेने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेस सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त शांतपणे, विनातक्रार, प्रतिकाराविना सामोरे गेले तर अज्ञात मारेकऱ्यांमुळे केलेल्या हल्ल्यांमुळे मानवतेसाठी, मानवांच्या समान हक्कांसाठी काम करणाऱ्या अब्राहाम लिंकन, डॉ रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग यांना आपले प्राण द्यावे लागले होते.

त्या प्रश्नाचे उत्तर अशाच प्रकारे आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी संबंधित होते. मानवी इतिहासात या उल्लेख केलेल्या महात्म्यांची नावे कायम राहतील यात शंकाच नाही. 

बापूंच्या जीवनाशी असलेल्या संबंधामुळे पत्रकार संघाच्या त्या माजी कार्यकारिणी सभासदाचे नावसुद्धा मानवी इतिहासात कायमच चर्चेत राहणार आहेे, या ना त्या कारणाने ! 

हा, तर त्या प्रश्नाचे उत्तर होते  `अग्रणी' नियतकालिकाचे संपादक  नथुराम गोडसे ! . .