Did you like the article?

Showing posts with label ख्रिस्ती. Show all posts
Showing posts with label ख्रिस्ती. Show all posts

Saturday, August 9, 2014

निसर्गानं बहरलेला ‘सृजनाचा मळा’ - फादर फ्रान्सिस दिब्रिटो -पुस्तक - परिचय -

निसर्गानं बहरलेला ‘सृजनाचा मळा’
- कामिल पारखे
Esakal,  रविवार, 3 ऑगस्ट 2014 - 01:26 PM IST

पुस्तक - परिचय
आपण सदैव निसर्गाच्या सान्निध्यात असतो, मात्र या समृद्ध निसर्गाच्या वैविध्याची अनुभूती आणि आस्वाद घेणाऱ्या व्यक्ती क्वचितच आढळतात. नेहमीच उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या सूर्यात काय नावीन्य आणि सौंदर्य, असं बहुसंख्य लोकांना वाटलं तरी संवेदनाशील व्यक्तीला प्रत्येक सूर्योदयात आणि सूर्यास्तात वेगवेगळ्या रंगछटांचं नावीन्य दिसत असतं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सृष्टीच्या या वेगवेगळ्या रूपांवर केलेलं चिंतन ‘सृजनाचा मळा’ या पुस्तकात आहे.

कविमनाचे फादर दिब्रिटो संवेदनाशील, हळवे आहेतच,  त्याशिवाय धर्मगुरू असल्याने आपल्या आसपास असलेल्या सृष्टीतील प्रत्येक बाबीवर चिंतन आणि मनन करण्याची त्यांची वृत्तीही आहे. त्यांच्या याआधीच्या पुस्तकांतून या प्रवृत्तीची वाचकांना ओळख झाली आहे. ‘सृजनाचा मळा’ हे पुस्तक सृष्टीच्या, निसर्गाच्या वेगवेगळ्या छटांवर लिहिलेले गद्य काव्य आहे. लेखकाचं बालपण निसर्गाची हरित देणगी असलेल्या वसईतील एका खेड्यात गेलं. त्यामुळे सृष्टीच्या, निसर्गाच्या विविध रूपांची त्यांना चांगली ओळख झाली.

आपल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे; ‘आमचं बालपण केळीच्या बागांत, फुलांच्या ताटव्यांत, नारळी-पोफळी, चिंच, आंबा, तसेच करंज, वड, पिंपळ यांच्या सावलीत गेलं. गाभुळलेल्या चिंचा, पाडाला आलेले आंबे, बोरीला लगडलेली आंबट-गोड बोरं, घमघमणारा शापित केवडा, अग्निवर्ण आणि पांगारा, जीव वेडा करणारी बकुळ फुलं, आदी गोष्टी आम्हाला नेहमी खुणावत असत. सकाळी केळीच्या पानांवरून टपटपणाऱ्या दवबिंदूंत आम्ही न्हाऊन निघत असू. समुद्राची गाज आमच्या कानात, नव्हे, काळजात घुमत असे. वृक्ष, वेली, वनचरे आम्हालाही सोयऱ्यासारखी वाटत होती. निसर्गाच्या मांडीवर बसून आही जीवनाचे धडे शिकत आलो आहोत. ही अवघी सृष्टी म्हणजे सृजनाचा फुललेला मळा आहे. या मळ्याला पै-पर्जन्याच्या धारा सिंचन करतात. एकाकी  वाटणाऱ्या आभाळात मेघदूत विहार करतात. येथे रहाटावरची माळ, न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते, वर येते, पन्हाळात रिकामे होते, रिकामी होते म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे. येथे जीव लावणारे लोभसवाणे पक्षी आणि आत्म्याचं पोषण करणारे कोकिळगान आहे. कोजागरीच्या रात्रीचा नृत्यरंग आहे. गंधाच्या रानात ‘तो’ आणि ‘ती’ यांनी मांडलेला खेळ आहे. न बोलणारा चाफा आहे. चिमणा-चिमणीचा रेशीमगर्भ संवाद आहे.’’

निसर्गाचं निरीक्षण करताना संवेदनाशील मनाने केलेलं हे मुक्त चिंतन आहे, जीवनावर केलेलं भाष्य आहे, निसर्गातील विविध ऋतू, कोकिळकूजन, आम्रवृक्ष, टपोरं चांदणं, सुवासिक फुलं, संध्याछाया, रहाटमाळ यांचं निरीक्षण करता करता लेखक भावुक होतो. हे निसर्गचक्र आणि सृष्टीतील या घडामोडी सर्वांच्याच नजरेसमोर होत असतात. लेखकाने ही निसर्गचित्रं ओघवत्या ललित शैलीत रेखाटल्याने सृष्टीकडे अधिक आपुलकीच्या नजरेने पाहण्याची वाचकांना प्रेरणा मिळते.

धर्मगुरू या नात्याने लेखकाने विविध देशांत भ्रमंती केली आहे, ख्रिस्ती धर्माबरोबरच मराठी संतसाहित्याचा, हिंदू धर्माचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्याचं प्रतिबिंब या पुस्तकातून अनेकदा पडतं. जगातील कानाकोपऱ्यांतील सृष्टीचं रूप किती विभिन्न आहे, याचं वर्णन करताना लेखकाच्या वैश्‍विक वृत्तीचंही दर्शन घडतं. या पुस्तकात बायबलचे उतारे आहेत तसे ज्ञानेश्‍वरी आणि मराठी संतसाहित्यातील अवतरणंही आहेत. कुसुमाग्रज, इंदिरा संत आणि अमृता प्रीतम यांच्या काव्यपंक्तीबरोबरच इंग्रजी, लॅटीन आणि इतर पाश्‍चिमात्य भाषांतील संदर्भही आहेत. स्कॉटलंडला २१ जूनला तेथील प्रथेप्रमाणे न मावळणारा दिवस आणि न उगवणारी रात्र जागून काढताना फादर दिब्रिटो आपल्याकडील कोजागरीचे स्मरण करतात. तेथे ढगामुळे नक्षत्रांचं दर्शन होत नव्हतं. येथे लेखक म्हणतो, ‘‘शरदियेचे चंद्रकळेमाजी, अमृतकण कोवळे’ आपल्याकडे लुटायला मिळतात, दुधाप्रमाणे उतू जाणारे टिपूर चांदणं ही आपली मिजास.’’ पृथ्वीतलावर निसर्गाच्या विविध रूपांचं लेखक वर्णन करतो, जसं आपल्याकडे असणारा पाऊस आणि इंग्लंडसारख्या देशात हवं असणारं निळेभोर आकाश आणि पिवळंजर्द लुसलुशीत ऊन. निसर्गाकडे पाहून आपल्या जीवनावर केलेलं चिंतन आणि भाष्य या पुस्तकाचा गाभा आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या, सृष्टीच्या विविध रूपांचं आकर्षण असणाऱ्या वाचकांना ही निसर्गचित्रं नक्कीच भावतील.
पुस्तकाचं नाव ः सृजनाचा मळा
लेखक ः फादर फ्रान्सिस दिब्रिटो
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठे : १३८, मूल्य ः १५०.