Did you like the article?

Saturday, June 17, 2023

Sunny Leone  सनी लिऑनचा प्रवास प्रौढ करमणूक क्षेत्र ते कान्स फेस्टिवल - 


सनी लिऑन.. सनी लिऑन  नावाभोवती एक वेगळेच वलय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची  प्रौढ करमणूक क्षेत्रातील भारतीय वंशाची एक व्यक्ती  म्हणून सुरुवातीची तिची ओळख भारतीयांना दोन दशकांपूर्वी झाली. कांहींनी तिच्याकडे डोळे विस्फारुन तर बहुतेकांनी तिला  कुचेष्ठेने पाहिले होते.

सत्तरच्या दशकांत शहराशहरांत, गावोगावी  बस स्टॅंडपाशी, थिएटरपाशी नियतकालिकांची आणि पुस्तकांची दुकाने असायची, किरकोळ वर्गणीवर चालणारी खासगी ग्रंथालये असायची.   तिथे पुस्तकांमध्ये अर्धवट झाकलेली पण तरीही अनेकांचे लक्ष  घेणारी काही पुस्तके असायची. तरुणांमध्ये आणि इतर वयोगटाच्या आंबटशौकिनांमध्ये  या पुस्तकांना खूप  मागणी असायची. वाचायची इच्छा असुनही ही पुस्तके घेण्याचे धाडस  अनेकांमध्ये नसायचे. प्रौढ करमणूक क्षेत्रातील ही पुस्तके होती.

नव्वदच्या दशकात गोव्यातून पुण्याला मी आलो तेव्हा  आमच्या इंडियन एक्सप्रेस-लोकसत्ता वृत्तपत्र समुहाच्या आम्हा बातमीदारांची  एका बातमीदाराच्या घरी एकदा  पार्टी झाली. तो बातमीदार विवाहित होता तरी त्यांचे कुटुंब यावेळी घरी नव्हते. बाकीचे आम्ही सर्व पुरुष बातमीदार सडेफटिंग होतो.   पार्टीच्या अखेरीस त्याने टेलिव्हिजन संचावर एक  डीव्हीडी  सीडी किंवा लावली. चित्रे अगदी अस्पष्ट होती.  

त्यानंतरच्या काळात जागोजागी सीडी आणि डीव्हीडी दुकानांत अशा सी-डीज  आणि डीव्हीडी खुल्लमखुलला  मिळू लागल्या. काही काळापूर्वी पुस्तकांच्या दुकानांत `पिवळी पुस्तके’ मिळायचे तसेच. अधूनमधून पोलिसांनी धड टाकून अशा आक्षेपार्ह डिव्हीडीजचा साठा ताब्यात घेतला अशा बातम्या वृत्तपत्रांतून झळकायच्या.

याच काळात विकेन्डच्या पुर्वसंध्येला - खरे म्हटले तर शुक्रवारी - शनिवारी मध्यरात्रीला - सर्व लोक झोपायला गेले असताना टीव्हीवर अचानक दुसरीच दृश्ये दिसायला लागायची.  अनेक ठिकाणी  स्थानिक केबल ऑपरेटर्स  आपल्या ग्राहकांसाठी ही खास सेवा पुरवत असत. या गोष्टीचा खूप बोलबाला झाल्याने ही सेवा खंडीत झाली आणि अनेकांचा रसभंग झाला, मात्र तोपर्यंत इतर कितीतरी पर्याय उपलब्ध झाले होते.

तर अशा या उघडपणे त्याज्य असलेल्या प्रौढ करमणूक क्ष्रेत्रातील सनी लिऑन हे भारतात माहित झालेले एक प्रमुख नाव.     

 या सनी लिऑनला जवळून प्रत्यक्ष पाहण्याचा योग अलीकडेच काही वर्षांपूर्वी आला होता  

आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री आमच्या इंग्रजी दैनिकाच्या  कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.

विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात. नियतकालिकांमधून आलेली सिनेमापरीक्षणे आणि वाहिन्यांमधून आलेले कार्यक्रम हे पेड न्यूज असतात हे आता सगळ्यांना माहित झाले आहेच. 

अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले

अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक.

आम्हा बातमीदारांचा विभाग फीचर्स टीमला लागून असायचा आणि त्यामुळे शेजारच्या कॉन्फरन्स रुममधल्या या मुलाखतीला बसता यायचे किंवा हे नट आणि नट्या येताना आणि जाताना त्यांचे दर्शन घडायचे.

 नाना पाटेकर आणि इतर काही कलाकार मंडळी `नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.  इरफान खान हा या असल्या एका प्रमोशन मुलाखतीला आलेला माझा अत्यंत आवडता अभिनेता.

 मात्र या काळात मुलाखतीला आलेल्या चित्रपट कलावंताला पाहण्यास ऑफिसच्या गेटबाहेरआणि आत सर्वाधिक गर्दी झाली ती फक्त एकदाच. 

त्यावेळी ऑफिसबाहेर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसले. शेवटी जवळच्या पोलिस चौकीला फोन करून वाढीव सुरक्षा कुमक बोलावी लागली होती

 आणि यावेळी मुलाखतीसाठी आली होती सनी लिऑन. आपल्या नवऱ्यासह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.

भरपूर उंची आणि उत्तम फिगर राखून असलेली सनी लिऑन. गेटपासून कॉन्फरन्स रूमकडे येऊ लागली तेव्हा तिच्यावर खिळलेल्या सर्वांच्या नजरा माझ्या आजही आठवणीत आहे. भरपूर संख्येने असलेले तिचे बॉडी गार्ड्स आगंतुक लोकांना तिच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवत होते.

 त्यावेळी कॉन्फरन्स रुम तर फीचर्स टीम मधल्या सहकाऱ्यांसह बातमीदार, जाहिरात आणि इतर विभागांतील लोकांनी गच्च भरली होती.

मुलाखत कशी झाली आणि सनी लिऑन नेमकी काय बोलली हे आता आठवत नाही. मात्र मुलाखतीनंतर तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी झालेली गर्दी आणि तिच्या बॉडीगार्डसनी काही लोकांना दाखवलेला हिसका मला आजही आठवतो.

 काही लोकांनी सनी लिऑनबरोबरच्या गर्दीत असलेले आपले  सेल्फीज आंणि इतर फोटो समाज माध्यमांवर टाकले होते आणि या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या.

तर अशी आगळीवेगळी कीर्ती असलेल्या या सनी लिऑनला अलिकडेच जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या फ्रान्समधल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर स्वागत होण्याच्या सन्मान मिळाला.

` कान्स फेस्टिव्हल २०२३’ साठी नामांकन कमावलेल्या अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या `केनेडी' चित्रपटातील एक कलाकार म्हणून सनी लिऑन या समारंभात सहभागी झाली होती. असा सन्मान खूप दुर्लभ  असतो हे सांगायलाच नको.    

या निमित्त सनी लिऑन हिची अनेक वृत्तपत्रांनी खास दाखल घेतली आहे.  

या चित्रपटाच्या एका प्रमुख भुमिकेसाठी सनी लिऑन हिची  अनुराग कश्यप यांनी  निवड केली याचे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते. सनी लियॉनचे काही चित्रपट याआधी झळकले असले तरी तिच्या अभिनयाऐवजी इतर बाबींचीच अधिक चर्चा झाली होती.

``
सनी लिऑन यांचे आधीचे चित्रपट आपण पाहिलेले नाही, मात्र तिच्या काही मुलाखती आपण पाहिल्या होत्या. सनीच्या डोळ्यांत मला दुःखाची छटा दिसली.'' असे अनुराग कश्यप यांनी सांगितले आहे.

अनुराग कश्यप यांनी याबाबत म्हटले आहे:

“I swear I have never seen her films, ever. I have seen her interviews. There is a certain sadness in her eyes. There has been a life in the past. I needed a woman over 40, who is sexualised by men around her, men who are in their 50s and 60s. I don't need to see the act of sex and all that. I need to see this woman who is also dealing with it, also handling it, also using it all in order to survive and navigate. In Sunny, I found a woman who came with all those things inbuilt."

या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या  Eye पुरवणीत (जून  ११. २०२३)  सनी लियॉनची विस्तृत, पाऊण पानभर मुलाखत आहे. कान्स फेस्टिव्हल झाल्यानंतर ही मुलाखत घेतली होती आणि चांगल्या, संयत  पद्धतीने लिहिली गेली आहे.  

प्रौढ करमणूक क्षेत्रातील कलाकार ते कान्स फेस्टिव्हल असा प्रवास केलेल्या सनी लिऑन साठी तो किती स्मरणीय अनुभव असेल याची कल्पना करता येईल.

Camil Parkhe