पत्रकारितेतील ‘त्या’ अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
पणजीच्या ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून १९८१ ला रुजू झाल्यावर सहा महिन्यांनी माझा बी.ए.चा निकाल आला आणि मी त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.साठी नोंदणी केली. मी अजून शिकत असल्याने संपादकांनी मला पूर्णवेळ कॅम्पस आणि क्राईम-कोर्ट रिपोर्टरची बीट दिली होती. डेंटल कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगबाबत बातमी देण्यासाठी म्हणूनच संपादकांनी त्या मुलीच्या घराकडे मला पाठवले होते.
आता मला अधुंक आठवते की, त्या मुलीचे घर म्हापशाला अल्तिनो (पोर्तुगीज भाषेत टेकडी )च्या पायथ्याला होते. मी घरी पोहोचलो तेव्हा मुलीच्या वडलांनी माझे स्वागत केले. घराच्या दिवाणखान्यात नजर टाकताच ते कुटुंब सुखवस्तू नव्हे तर अतिश्रीमंत होते, हे पटकन लक्षात येत होते. मी माझे व्हिजिटिंग कार्ड देताच मुलीच्या वडलांनी आपली ओळख करून दिली आणि स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड दिले. पेटकर या नावाचे ते गृहस्थ केंद्र सरकारचे ‘स्टँडिंग कौन्सिल’ होते. म्हणजे केंद्र सरकारसंबंधी कुठलीही केस असली तर वकील म्हणून बाजू मांडण्याचे त्यांना अधिकार होते, असे त्यांनी लगेचच मला स्पष्टीकरणही दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात क्राईम-कोर्ट रिपोर्टर म्हणून मी नियमितपणे हजेरी लावत असलो तरी हे पद मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्या संपूर्ण हॉलमधल्या भिंतीतल्या काचेच्या कपाटातील पुस्तके कसली असतील, हे मला आता समजले.
चहा बिस्किटे टेबलावर येईपर्यंत वकीलसाहेबांनी केसची मला थोडक्यात माहिती दिली. पणजीपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर बांबोळीतील गोवा डेंटल कॉलेज (डीएमसी) मध्ये पहिल्या वर्षाला असलेल्या त्यांच्या मुलीवर गेले काही दिवस रॅगिंग होत होते आणि त्याबाबत ती स्वतः वार्ताहराशी म्हणजे माझ्याशी बोलायला तयार आहे असे त्यांनी सांगितले. एक वकील म्हणून या प्रकरणातील सर्व कायदेकानूंबाबत ते खबरदारी घेत होते, हेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर लगेचच ती रॅगिंग पीडित मुलगी आतल्या खोलीतून बाहेर येऊन माझ्यासमोर आपल्या वडलांशेजारी सोफ्यावर बसली. बातमीदार म्हणून आता माझी मुलाखत सुरू झाली होती.
माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. कोण रॅगिंग करते, कशा प्रकारचे रॅगिंग आणि किती दिवस हा त्रास चालू वगैरे प्रश्न होते. ही घटना ऐंशीच्या दशकातील आहे, तोपर्यंत रॅगिंगविषयी स्वतंत्र कायदे वा नियमावली बनवण्यात आली नव्हती. रॅगिंगविषयी तक्रार व वृत्तपत्रात बातमी आल्याचे मी कधी ऐकले नव्हते. तरी एक बातमीदार आणि क्राईम रिपोर्टर या दृष्टिकोनातून मी माझे प्रश्न विचारत होते. प्रश्नाचे उत्तर देताना ती मुलगी अडखळत होती आणि आपल्या वडलांकडे मदतीसाठी पाहत होती. पेटकरही आपल्या अशिलाच्या मदतीला यावे, तसे मुलीचे अर्धवट वाक्ये स्वतः पूर्ण करत होते. अतिरिक्त माहिती पुरवत होते. मी माझ्या प्रश्नांचा रोख पुन्हा त्या मुलीकडे वळवत असे आणि पुन्हा पेटकर वकील होणाऱ्या रॅगिंगबद्दल अधिक तपशील पुरवून आपल्या मुलीची बाजू बळकट करत होते.
त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या रॅगिंगच्या तपशीलाच्या नोटस घेऊन मी ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिसात पोहोचलो, तेव्हा संपादकांनी लगेचच मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. त्या दिवसाची ती सर्वांत मोठी (‘ब्रेकिंग न्यूज’ हा शब्द तोपर्यंत रूढ झाला नव्हता.) बातमी होती, हे मला लगेचच लक्षात आले.
‘येस कामिल, टेल मी व्हॉट इज द स्टोरी’, आमच्या संपादकांनी मला विचारले. त्यांचे वय अवघे अठ्ठावीस वर्षे असले तरी बिक्रम व्होरा हे एक अनुभवी पत्रकार होते. ‘इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी साप्ताहिकात संपादक खुशवंत सिंग यांच्या तालमीत ते तयार झाले होते. शिवाय टेलीव्हिजन घराघरांत पोहोचण्याआधीच ‘क्विझ मास्टर’ म्हणून त्यांची छबी टेलिव्हिजनवर झळकली होती.
मी माझे ब्रिफिंग सुरू केले. त्या मुलीवर तिच्या वर्गातील आणि वरच्या वर्गातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे रॅगिंग करत होते. डेंटल कॉलेजमध्ये कृत्रिम दात तयार करण्याच्या साच्यांसाठी वापरले जाणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखे पदार्थ तिच्या तोंडात कोंबले जात होते, बांबोळीहून पणजीला सांता क्रुझ पाटो कॉलनीमार्गे डीएमसीच्या बसने येता-जाताना तिला मुद्दाम सीट दिली जात नव्हती आणि चालत्या बसमध्ये धक्के देऊन पाडले जात होते. क्लासमध्ये आणि कॉलेजमध्ये सगळीकडे तिला वेगळे पाडून तिच्याशी कुणाला बोलू दिले जात नव्हते. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी होत्या. ३५ वर्षांपूर्वीच्या त्या रॅगिंगबाबतच्या अधिक तक्रारी आता आठवत नाहीत. मात्र दखल घेतली जावी, असे त्या आरोपांचे स्वरूप गंभीर होते हे निश्चित.
ही बातमी मी टाइपरायटरवर मंद गतीने टाईप करणार, त्यानंतर उपसंपादक वा मुख्य उपसंपादक त्या न्यूज कॉपीतील स्पेलिंग करेक्ट करणार. वाक्यरचना बदलणार आणि नंतरच तळमजल्यावर लायनोटाइप मशिनवर टाइप करायला पाठवणार या प्रक्रियेत वेळ घालवण्याइतका संयम संपादकसाहेबांना नव्हता. झटकन त्यांनी समोरचा पॅड पुढे ओढला आणि पेन स्टँडमधला एक पेन घेऊन मान तिरकी करून डाव्या हाताने ते स्टोरी लिहू लागले. अध्येमध्ये ते मला एखादा तपशील विचारत होते. पाचदहा मिनिटांत दीड पानांची बातमी लिहून त्यांनी ती माझ्यासमोर ठेवली. बायलाईनमधील माझ्या आडनावातील ‘पारखे’ऐवजी ‘पारके’ ही चुकीची स्पेलिंग वगळता त्या कॉपीत मला कुठलाही विपर्यस्त शब्द आढळला नाही. ‘डन?’ असा प्रश्न विचारून माझा होकार येताच व्होरासाहेब खुर्चीतून उठून गॅलरीत गेले.
संपादकांनी लिहिलेली ती स्टोरी त्यांच्या पर्सनल असिस्टंटने टाईप करून न्यूज डेस्ककडे सोपवली. दुसऱ्या दिवशी पान एकवर अँकर म्हणून जाणाऱ्या त्या स्टोरीवर न्यूज डेस्कला काही काम करण्याची गरज नव्हती. व्होरासाहेबांनी बातमीला हेडिंगसुद्धा दिले होते.
दुसऱ्या दिवशी रविवारी ती बातमी प्रसिद्ध झाली. गोव्याची राजधानी असली तरी रविवारी पणजी अगदी शांत असते. त्या दिवशी संपादक, मुख्य वार्ताहर आणि इतर ज्येष्ठ मंडळी सुट्टीवर असायची. सोमवारी माझी साप्ताहिक सुट्टी म्हणून ताळेगावात मी घरीच राहिलो. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीत आमच्या ऑफिसात काय गोंधळ उडाला, याची मला मंगळवार सकाळपर्यंत काही कल्पनाही नव्हती.
त्या सोमवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान गोवा डेंटल कॉलेजच्या दोन बसेस ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिससमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यातून पांढरे अॅप्रन घातलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी उतरले आणि आमच्या ऑफिसात घुसले. त्या काळात दैनिकाच्या ऑफीससमोर गुरखा वा वॉचमन ठेवण्याची पद्धत रूढ झाली नव्हती. आमच्या दैनिकाच्या एकमजली कौलारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या संपादकीय विभागात त्यांच्या नेत्यांनी संपादक व्होरा यांच्यासमोर आपली बाजू मांडली. आम्ही रॅगिंगची जी बातमी छापली, त्यात अजिबात तथ्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्या मुलीचे किंवा इतर कुणाचेही कुठल्याही प्रकारचे रॅगिंग झाले नाही. तुमच्या बातमीमुळे निष्कारण डेंटल कॉलेजची आणि विद्यार्थ्यांची बदनामी झाली, असे त्यांचे म्हणणे होते.
संपादक बिक्रम व्होरा यांनी कशा प्रकारे त्या संतप्त विद्यार्थ्यांची समजूत घातली, याची मला कल्पना नाही. मात्र दुसऱ्या दिवशीच्या ‘नवहिंद टाइम्स’मध्ये तिसऱ्या पानावर पहिल्या कॉलममध्ये अगदी तळाशी ‘क्लॅरिफिकेशन’ या हेडिंगखाली त्या विद्यार्थ्यांना कोट करून रॅगिंगचा प्रकार झालाच नाही असे लिहिले होते. या चुकीच्या बातमीबद्दल संपादक दिलगीर आहेत, असे त्या त्यात शेवटी म्हटले होते.
मंगळवारच्या अंकात हा खुलासा पाहून आणि नंतर इतर सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर माझ्या अनुपस्थितीत आदल्या दिवशी ऑफिसात काय गदारोळ उडाला होता हे मला कळाले. रॅगिंगची ही सनसनाटी बातमी देण्याआधी कॉलेजच्या डीन आणि इतर अधिकाऱ्यांशी, तसेच संबंधित विद्यार्थ्यांशी बोलून दोन्ही बाजू प्रसिद्ध करण्याचे तारतम्य मी आणि माझ्या संपादकांनी पाळले नव्हते. मात्र विद्यार्थ्यांशी बोलणे झाल्यानंतर तातडीने छोट्या स्वरूपात का होईना दिलगिरी व्यक्त करून आमच्या संपादकांनी पत्रकारितेचे एक साधेसुधे तत्त्व विनातक्रार पाळले होते. विशेष म्हणजे माझी या बातमीच्या संदर्भात चूक झाली असे म्हणत एका शब्दानेही ते दुसऱ्या दिवशी माझ्यावर रागावले नाहीत. कारण या बातमीतील एकूण एक शब्द त्यांनी स्वतःच लिहिला होता. त्याशिवाय या पूर्ण चुकीच्या बातमीबाबत ‘नवहिंद टाइम्स’ने छोटीशी का होईना, पण दिलगिरी व्यक्त केल्याने डीएमसीच्या विद्यार्थ्यांचेही पूर्ण समाधान झाले होते.
त्या कथित रॅगिंग झालेल्या त्या ‘पीडित’ मुलीने वा प्रस्थापित वकील असलेल्या तिच्या वडिलांनीही आपली बाजू मांडण्यासाठी नंतर माझ्याशी वा आमच्या दैनिकाशी कधीही संपर्क साधला नाही, यातून त्यांची लंगडी बाजू स्पष्ट झाली. त्या मुलीनेच कुठल्यातरी कारणास्तव रॅगिंगचा बनाव केला होता. वकिलीची चांगली प्रॅक्टिस असलेले तिचे वडील आपल्या लाडक्या, एकुलत्या एक लेकीच्या बनावाला बळी पडले होते. आणि क्राईम कोर्ट बीटचा बातमीदार म्हणून मीसुद्धा.
पत्रकारितेत वा कुठल्याही व्यवसायात आणि क्षेत्रांत अशा अक्षम्य मानवी चुका घडू शकतात. पुष्कळदा त्या हेतुपूर्वक नसतात. त्यामुळे त्या चुका वेळीच स्वीकारून, डॅमेज कंटोल करून परिस्थिती नियंत्रणात आणणे, सुज्ञपणाचे असते. संपाद्क बिक्रम व्होरा यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता तात्काळ माघार घेतली आणि या विषयावर लगेच पडदा पडला. हे बिक्रम व्होरा एक-दोन वर्षांतच बेटर प्रॉस्पेक्टसाठी आखाती देशांत गेले आणि तेथे त्यांनी तीन दशके ‘गल्फ न्यूज’ आणि ‘खलीज टाइम्स’ या आंतरराष्ट्रीय पातळीच्या वृत्तपत्रांत संपादक म्हणून काम केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’त त्यांचे खुमासदार शैलीचे लेख हल्ली अधूनमधून प्रसिद्ध होत असतात.
या काळात बांबोळी येथे वा डेंटल कॉलेजशेजारी असलेल्या इमारतीत नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा विद्यापीठाचे कार्यालय तात्पुरते उघडण्यात आले होते. डीएमसीच्या विद्यार्थ्यांची आणि माझी या प्रकरणात कधीही प्रत्यक्ष गाठभेट झालेली नव्हती, तरीही या वादग्रस्त बातमीनंतर गोवा विद्यापीठाच्या कार्यालयात बातमीसाठी जाण्याचे धाडस मला अनेक दिवस झाले नाही. त्या दिलगिरीनंतर याबाबतीत संबंध असलेल्या सर्व लोकांच्या दृष्टीने हे प्रकरण एकाच दिवसात निकाली निघाले.
१९७४ पासून माझे छापील नाव वा बायलाईन असलेली शेकडो कात्रणे मी आजपर्यंत जपून ठेवली आहेत. त्यामध्ये पान एक वरच्या या वादग्रस्त बातमीचे कात्रण अर्थातच नाही. इंग्रजी भाषेतील पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीत अनवधानाने, हलगर्जीमुळे वा क्वचित मुर्खपणामुळे विपर्यस्त, चुकीच्या बातम्या देण्याच्या इतरही अनेक घटना माझ्या हातून झाल्या आहेत. मात्र न झालेल्या रॅगिंगची ही बातमी आणि त्यामुळे आमच्या दैनिकावर आलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा, ही त्यातली सर्वांत मोठी घटना म्हणावी लागेल. पत्रकारितेतील या एका अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल साडेतीन दशकांच्या कालावधीनंतर माझ्या मनात आजही आहे.
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
No comments:
Post a Comment