अरविंद निर्मळ हे भारतातील दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीचे एक प्रमुख प्रणेते.
जालना येथे जन्म झालेल्या  निर्मळ यांनी मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि नंतर बेंगलोर येथे  युनायटेड थिऑलॉजिकल  कॉलेजात  (UTC) अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राद्यापक म्हणून कार्य केले. 
तिथेच त्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला आणि ख्रिस्ती थिऑलॉजीची त्या दृष्टिकोनातून मांडणी केली. 
ख्रिस्ती समाजातील ब्राह्मण्यवादाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.  
ख्रिस्ती ईशज्ञानापेक्षा पूर्णतः वेगळे असलेले त्यांचे हे विचार  प्रस्थापित धर्माचार्यांच्या दृष्टीने खूप धक्कादायक होते आणि त्यामुळे निर्मळ यांना खूप त्रास सहन करावा लागला. 
आजही अरविंद पौलस निर्मळ   ( १९३६-१९९५) यांचे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन थिओलॉजीविषयक विचार जवळजवळ बहिष्कृत  करण्यात आले आहेत.   
इतकेच नव्हे तर प्रस्थापित ख्रिस्ती  - कॅथोलिक   आणि प्रोटेस्टंट -  वर्तुळांत `दलित' हा शब्द किंवा त्यास असलेला कुठलाही पर्यायी शब्द आजही लांच्छनीय किंवा घृणास्पद मानला जातो. 
अरविंद निर्मळ यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे बेंगलोरहून महाराष्ट्रात  परत आल्यानंतर त्यांनी येथे दलित थिओलॉजी आणि लिबरेशन  थिओलॉजीचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले. 
यासाठी त्यांनी १९२७ सालापासून सुरु असलेल्या आणि प्रस्थापित झालेल्या  मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून एक वेगळी  चूल मांडली. 
नगर येथे १९९२ साली त्यांनी पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले. 
या संमेलनास किती प्रखर विरोध झाला  ते त्यावेळच्या बातम्यांमधून दिसते. 
आपल्या या चळवळीत अरविंद निर्मळ यांनी सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ  आणि उषा वाघ, `आपण' साप्ताहिकाचे संपादक सत्यवान नामदेव  सूर्यवंशी,  वामन निंबाळकर, प्रा. अविनाश डोळस आदींना आपल्याबरोबर घेतले.
स. ना. सूर्यवंशी आणि देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने आयोजित केली. त्यानंतर निर्मळ यांचे निधन झाले. 
मात्र ही पोस्ट मुख्यतो अरविंद निर्मळ यांच्यावर नाही, 
निर्मळ यांच्यानंतर महाराष्ट्रात दलित ख्रिस्ती चळवळ आणि संमेलने एकाहाती चालू ठेवणारे  सुभाष चांदोरीकर यांच्यावर आहे. 
निर्मळ यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरांत  दलित ख्रिस्ती संमेलने भरवण्याचे कार्य आणि  त्याद्वारे ही चळवळ चालू ठेवण्याचे  एक खूप अवघड काम चांदोरीकर यांनी चालू ठेवले आहे.  
बिशप प्रदीप कांबळे, डॉ गिल्बर्ट लोंढे,, वसंत म्हस्के, अनुपमा डोंगरे जोशी, जेसुईट फादर ज्यो गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पुणे, नागपूर, उदगीर, श्रीरामपूर आणि  संगमनेर येथे ही संमेलने भरवली. 
आतापर्यंत एकूण अकरा दलित ख्रिस्ती संमेलने भरली आहेत.  त्यापैकी नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथे मी हजेरी लावलेली आहे.  
यापैकी काही संमेलनाध्यक्षांची भाषणे सुनील आढाव यांच्या `धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा' शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा'   या ग्रंथात (दिलीपराज प्रकाशन 2003 )   समाविष्ट आहेत.  
दलित या शब्दाची अनेकांना अँलर्जी अन वावडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरु नये असा आदेश काढला आहे. 
मात्र त्यासाठी चपखल किंवा पर्यायी असा शब्द अजून तरी शोधण्यात आलेला नाही. 
शाहू पाटोळे यांचे `दलित किचन्स इन मराठवाडा' हे इंग्रजी पुस्तक हल्ली गाजते आहे. 
आपल्या `भारत यात्रेत' राहुल गांधी यांनीसुद्धा त्यांची या संदर्भात भेट घेतली होती. 
`दलित  किचन्स' ऐवजी कुठला इतर चपखल बसणारा पर्यायी शब्द वापरता आला असता?   
सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रकाशित केलेल्या माझ्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद' या पुस्तकात ' निग्रो ते आफ्रिकन-अमेरिकन, अस्पृश्य ते दलित' या नावाचे एक प्रकरण आहे. 
त्यात दलितांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या संबोधनात होत गेलेल्या बदलाविषयी डॉ. जनार्दन वाघमारे यांचे एक विधान मी उदगृत केले  आहे.
 'नावात किती आशय असतो हे यावरून लक्षात येईल. कुणास ठाऊक, हे नावही उद्या बदलेल. 'दलित' हे नावदेखील पुढे कायम राहील ते छातीठोकपणे सांगता येणार नाही.''.  
त्यावेळी मलासुद्धा असे वाटले नव्हते.  
सुभाष चांदोरीकर हे  प्रोटेस्टंटपंथीय मेथॉडिस्ट चर्चचे एक पाळक आणि अधिकारी राहिले आहेत. 
आता निवृत्त झाले आहे. दलित चळवळीवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी काही सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.
काल चांदोरीकर यांची त्यांच्या पुण्यातील नळ स्टॉपजवळील घरी भेट घेतली. 
त्यांच्याबरोबर काही फोटोही घेतले. 
त्यानिमित्त त्यांची समाजमाध्यमावर ही ओळख.     
Camil Parkhe, May 14, 2025