Did you like the article?

Showing posts with label Antarkar. Show all posts
Showing posts with label Antarkar. Show all posts

Wednesday, April 27, 2022

नथुराम गोडसे  आणि महात्मा गांधीं

पणजी येथे धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी कॅथोलिक धार्मिक अशी होती, नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. मँगोलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आलेले समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हेसुध्दा शालेय शिक्षणानंतर असेच फादर होण्यासाठी सेमिनिरीत दाखल झाले होते.

पदवीला मी तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. माझ्या आसपासचे काही जेसुईटस शिक्षण तज्ज्ञ होते काही पीचडी धारक होते आणि एक चक्क व्यवस्थापन (मॅनेजमेंट ) तज्ज्ञ होते.
तर या कॉलेज जीवनात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात मी यथेच्छ डुंबलो. याकाळात शिक्षणाचा आनंद मी घेतला तितका आधी कधीही घेतला नव्हता. याचे मुख्य कारण होते मिरामारच्या धेम्पे कॉलेजातले माझे तत्त्वज्ञानाचे शिक्षक एन. जी. मिश्रा, आफांसो सिनियर, आणि मुंबई विद्यापीठातील पणजी पदव्युत्तर केंद्रातील दोन शिक्षक डॉ. शि. स. अंतरकर आणि अँग्नेलो आफांसो ज्युनियर.
तत्त्वज्ञानाच्या या चारही शिक्षकांनी धर्मगुरु होण्यासाठी गोव्यात आलेल्या मला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आमची पदवी परीक्षा होण्याआधीच मी धर्मगुरु होण्याविषयीचा माझा निर्णय बदलला आणि तसे आमच्या जेसुईट सुपिरियर धर्मगुरुंना कळवलेसुद्धा.
या टप्प्यात शि. स. अंतरकर सरांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. मुळात कट्टर सनातनी पार्श्वभूमी असलेले अंतरकर मुंज झाल्यापासून शेंडी राखत आणि धोतर नेसत, तसेच संस्कृत श्लोकांचे पठण करत असत नंतर मात्र ते पुर्णतः इहवादी, नास्तिक झाले आणि मला शिकवत असताना ते Empiricism किंवा अनुभववाद यातील एक शाखा असलेल्या लॉजिकल पॉझिटिव्हीझम या विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. या विचारसरणीचे प्रणेते असलेल्या सर ए. जे. एयर ( Sir A. J. Ayer ) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याचे इंग्रजी पुस्तकही त्यांनी मराठीत आणले होते.
तर या अंतरकर सरांशी एकदा संभाषण चालू असताना माझ्या बोलण्यात 'माथेफिरु' नथुराम गोडसे ' असा शब्दप्रयोग आला.
"माथेफिरु ? नथुराम गोडसेला 'माथेफिरु ' कसं म्हणता येईल?" असा अंतरकरांचा सवाल होता.
"नथुराम गोडसेचं डोकं फिरलंIn म्हणून त्यानं गांधीची. हत्या केली नव्हती, त्याचं कृत्य हे विचारपूर्वक केलेलं कृत्य होतं. भले तुम्ही त्याच्या विचारांशी तुम्ही सहमत नसताल पण तुम्ही त्याने केलेल्या हिंसक कृत्यामुळे त्याला 'माथेफिरु' म्हणू शकत नाही, " असा त्यांचा युक्तीवाद होता.
"यामागचे कारण म्हणजे आपण काय केले आणि कशासाठी केले हे नथुरामने नंतर सविस्तरपणे सांगितले होते," असे अंतरकर म्हणाले.
अंतरकर सरांचं ते वक्तव्य ऐकून मी एकदम थक्क झालो. शालेय जीवनापासून नथुराम गोडसे हे नाव कायम ' माथेफिरु' या विशेषणासह वापरले जात होते, बहुधा अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा हाच शब्द असायचा. गुलामगिरी कायद्याने नष्ट करणारे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या सुध्दा एका अज्ञात माथेफिरुने केली असेच वर्णन असायचे.
अंतरकर सर स्वतः आपली सनातनी आणि कर्मठ व्यक्तिपासून ते इहलोकवादी असा प्रवास झाल्याचे त्यांच्या क्लासरुम लेक्चर्समध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांत नेहेमी सांगत असत. मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख असलेले मे. पु. रेगे यांना त्यांनी पणजीतल्या आम्हा तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहुणे व्याख्याते म्हणून बोलावले होते. रेगे सरांशी आम्ही संवाद साधला होता.
मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TI S S) मध्ये असलेल्या य. दि. फडके यांच्याशीही त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांशी गाठ घडवून आणली होती. विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची अंतरकरांची नेहेमी धडफड असायची.
पणजीतल्या १८ वा जून रोडवर असलेल्या पदव्युत्तर केंद्राच्या सुशिला बिल्डींगमधला 'माथेफिरु नथुराम' बाबतचा तो संवाद तब्बल चार दशकानंतर मला आजही आठवतो.
डॉ. अंतरकरांच्या तात्त्विक निष्ठांबाबत मला कुठलीही शंका नसली तरी नथुरामला 'माथेफिरु' म्हणून न संबोधण्याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेने मला खूप संभ्रमात टाकले.
याच दरम्यान पदव्युत्तर शिक्षण चालू असताना मी पणजीला नवहिंद टाइम्सचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. बॉम्बे हायकोर्टाच्या पणजी खंडपीठातील कायद्यासंदर्भात बातम्या देताना अनेक कायदेशीर बाबी कळल्या. त्यापैकी एक म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देत नाही तर त्यांची मनोरुग्ण म्हणून एखाद्या पुनर्वसन संस्थेत रवानगी करते.
मुंबईत अनेक लोकांची हत्या करणाऱ्या रामन राघव या खतरनाक माथेफिरु व्यक्तीची याच तत्त्वामुळे फाशी टळली होती. बापुजींचे खुनी असलेल्या नथुराम गोडसेबाबत अंतरकर एका अर्थाने बरोबर होते हे मग मला नंतर कळाले.
Freedom of Will किंवा स्वतंत्र इच्छाशक्ती यास धर्मात, नितीशास्त्रात आणि न्यायशास्त्रात एक अत्यंत आगळेवेगळे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. माथेफिरु किंवा वेडसर व्यक्तीला दोषी ठरवण्याबाबतचे अनेक नियम लागू होत नाहीत ते यामुळेच.
हे संभाषण झाल्यावर मी लवकरच गोवा सोडले. कालांतराने अंतरकर मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागप्रमुख बनले आणि हे 'माथेफिरू नथुराम' प्रकरण मी विसरलो. माझ्या विस्मृती पटलात हा विषय कधीच ढकलला गेला होता.
नव्वदच्या दशकात पुण्यातील एका विधानसभा निवडणुकीत गांधीहत्या आणि नथुराम गोडसे हा विषय एक मुद्दा बनला आणि काही लोकांमध्ये नथुराम गोडसे या व्यक्तीविषयी किती आदर आहे याची भयचकित करणारी जाणीव मला तेव्हा झाली.
अंतरकर सरांचा '' माथेफिरु ' या शब्दाला असलेला आक्षेप ऐकून मला बसलेला धक्का अगदी मामुली होता, पुण्यात उघडपणे अनेक नथुराम गोडसेवादी आहेत हे लक्षात येऊन मी थक्क झालो होतो.
हिमानी सावरकर या विनायक दामोदर सावरकर यांच्या धाकट्या भावाच्या सून आणि गांधी खून खटल्यात शिक्षा भोगून परतलेल्या गोपाळ गोडसे यांची त्या कन्या म्हणजे नथुरामच्या पुतणी होत्या. त्यांनी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
झाले, त्यानंतर नथुराम गोडसे, 'गांधीहत्या आणि मी' हे पुस्तक लिहिणारे नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे, महात्मा गांधी हत्या खटल्यात अडकलेले सावरकर या सर्वांविषयी पुण्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील नियतकालिकांत रकानेच्या रकाने भरुन मजकूर येऊ लागला.
प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नव्वदच्या दशकात आणलेल्या नाटकाने त्यावेळी कितीतरी लोकप्रक्षोभ अनुभवला होता. अशी मांडणी असलेले नाटक रंगभूमीवर यावे, त्यावे प्रयोग करण्यात यावे ही कल्पनाच. त्यावेळी समाजाच्या मोठया घटकास मुळी मान्यच नव्हती. या नाटकाच्या प्रयोगास विरोध करणारे विचारमंथन त्याकाळात झाले होते ते आजही आठवते.
खूप उशिरा या नाटकाच्या सादरीकरणास परवानगी मिळाली. नथुराम गोडसेची भुमिका मांडणारे नाटक मराठी रंगभूमीवर येऊ शकते, थिएटरमध्ये अशा नाटकाला प्रेक्षकांचा उत्फुर्त, भरभरून प्रतिसाद मिळू शकतो यावर विश्वास ठेवायला नंतर खूप जड गेले.
साठ- सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत महाराष्ट्रात याच्या अगदी उलट स्थिती होती ! मी शाळेत असताना साने गुरुजी कथामाला वगैरेंसारखे कार्यक्रम श्रीरामपुरात आणि महाराष्ट्रात गावोगावी राबवले जात. त्याकाळात नव्या दमाच्या, नव्या प्रागतिक विचारांच्या बंडखोर तरुणांनी, संघटनांनी समाजात अगदी रान उठवले होते. या पिढीतील अनेक जण गेल्या दशकात काळाच्या पडद्याआड झाले, अजूनही आहेत ते प्रभावहीन झाले आहेत.
त्यामुळे आता थेट महात्मा गांधींना किंवा त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या घटनांविषयी ना कुणाला खेद वा खंत वाटतो. भर सभेत आणि पवित्र संसद सभागृहातसुद्धा अशा धक्कादायक घटना घडतात. बापूंना शिव्या घालणारे, गरळ ओकणारे रातोरात सेलिब्रिटी होतात, हे वलय मग त्यांना कित्येक वर्षे खूप लाभ देऊन जाते.
आणि ही तीनचार वर्षांपूर्वीची घटना. `सुगावा प्रकाशना'च्या विलास वाघ सरांना भेटायला त्यांच्या पुण्यातील कार्यालयात गेलो होतो. वाघ सर कुठे बाहेर गेले तेव्हा सहज समोर डेस्कवर असलेले एक जुने पुस्तक उचलले आणि मी चमकलोच.
गोपाळ गोडसे यांचे 'गांधीहत्या आणि मी' हे ते पुस्तक होते. पटकन मी पुस्तकाची प्रस्तावना वाचायला घेतली आणि झटकन वाचून संपवली. प्रस्तावना वाचून थक्क झालो होतो मी. त्या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या होत्या आणि त्यावरुन पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद लक्षात येत होता. वाघ सरांना मी याबाबत बोललो सुद्धा.
``विचारांच्या लढाईत आपण माघार घेता कामा नये, प्रतिवाद सतत चालू ठेवला पाहिजे,'' असे वाघ सर त्यावेळी म्हणाले होते.
या रविवारच्या (February 6, 2022) इंडियन एक्सप्रेसमध्ये अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेच्या भुमिकेवर लिहिले आहे. ‘एक राजकारणी म्हणून ही भुमिका स्विकारण्याआधी कोल्हे यांनीं खूप खूप विचार करायला हवा होता, असे नासिरुद्दीन यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षाची भुमिका लोकांपुढे मांडणे हे कुठल्याही राजकारण्याचे पहिले कर्तव्य असते असे नासिरुद्दीन यांनी म्हटले आहे.