Did you like the article?
Friday, March 19, 2021
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी
पडघम - देशकारण
कामिल पारखे
इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि भाजप
Sat , 06 April 2019
पडघमदेशकारणलोकशाहीनिवडणुकाइंदिरा गांधीराजीव गांधीपी. व्ही. नरसिंहरावअटल बिहारी वाजपेयीबाळासाहेब ठाकरेशरद पवारSharad Pawar
देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा मी सर्वप्रथम अनुभव घेतला तो बांगलादेश मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ साली निवडणुका लढवल्या तेव्हा. कोपरगाव लोकसभा मतदारसंघात डाव्या पक्षाच्या पी. बी. कडू यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे एकनाथ विठठलराव विखे उभे होते. अहमदनगर जिल्हा त्या काळात डाव्यांचा बालेकिल्ला होता. सुरुवातीला नवखे उमेदवार असलेल्या विखेंनी अखेरीस निवडणुकीत बाजी मारली. याचे कारण इंदिरांच्या नेतृत्वाखाली गाय-वासरू चिन्ह असलेल्या नवकाँग्रेस पक्षानं संपूर्ण देशात संघटना काँग्रेसच्या बैलजोडीला, जनसंघाच्या पणतीला, डाव्यांच्या लाल बावट्याला आणि इतर पक्षांना निवडणुकीत धूळ चारली होती. ‘गाय-वासरू नका विसरू’ ही घोषणा अजूनही आठवते.
या बाळासाहेब विखेंनी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील पाच दशके आपली मांड व्यवस्थित बसवली. त्यांनतर १९७२ ला विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघात अशोकनगर साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या बंडखोर उमेदवार भाऊसाहेब गलांडे पाटलांना गोविंदराव आदिक या तरुण वकिलाने कसे हरवले हे मी जवळून पाहिले.
या दोन निवडणुकांच्यावेळी मी सहावी-सातवीला होतो. निवडणुकांत कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरतात, कुंपणावरचे मतदार अखेरच्या क्षणी निवडणुकीचे कौल कसे ठरवतात, याची आमच्या घरात असलेल्या पाच मतांवरून अंदाज आला. मतदानाच्या आदल्या रात्री मतांचा भाव फुटे आणि पक्षांचे नेते एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला घेऊन घराघरांत फिरत. घरटी किती मते आहेत, याची कार्यकर्त्यांना माहिती असे. तेव्हा पाच-दहा रुपयांच्या नोटा मोजत असलेल्या कार्यकर्त्यांकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या गरीब मतदारांचे चेहरे आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी मी कराडला अकरावीला होतो. जनता पक्षाच्या प्रचाराला मी झोकून घेतले होते. सातारा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाण आणि कराड मतदारसंघात प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) यांच्या विरोधात आमचा जनता पक्षाच्या वतीने प्रचार होता. मतदानानंतर भल्या पहाटे कराडहून एका ट्रकने आम्ही कार्यकर्ते साताऱ्याला मतमोजणीसाठी गेलो होतो. त्या दोन मतदारसंघातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालू होती. रात्री दोनच्या सुमारास कुणीतरी सांगितले की, रेडिओ बीबीसीने जाहीर केले की, पंतप्रधान इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडणूक हरल्या आहेत. ती बातमी ऐकून त्या मतदान मोजणी मंडपातील वातावरणच बदलून गेले. यशवंतराव आणि प्रेमलाकाकी प्रचंड मताधिक्याने निवडून येऊनसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुतक होते, तर आम्हा जनता पार्टीच्या लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
१९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीतील एक अविस्मरणीय घटना आठवते. सत्ता गमावलेल्या इंदिरा गांधी डिसेंबर महिन्यात गोव्याच्या निवडणूक दौऱ्यावर होत्या. पणजीत गाडीतून उतरून इंदिराजी लोकांना अभिवादन करताना आणि मांडवी हॉटेलमध्ये शिरत असताना मी त्यांच्यापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर उभा होतो. नंतर अर्ध्या तासानंतर मांडवीच्या तीरावर कम्पाल ग्राऊंडवर त्यांचे भाषणं मी ऐकले. त्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्ष प्रचंड मताने देशात सत्तेवर आला. आणीबाणीमुळे खूप बदनाम झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा एकदा इतक्या मताधिक्याने निवडून येतील असे कुणाला वाटले नव्हते.
गंमत म्हणजे त्याचवेळी झालेल्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या निवडणुकीत मात्र यशवंतराव चव्हाण आणि देवराज अर्स यांच्या काँग्रेस पक्षाने शशिकला काकोडकरांच्या महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली. केंद्रात तर इंदिरा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता. ही मोठी विचित्र राजकीय घटना असल्याने प्रतापसिंग राणे आणि डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील गोवा अर्स काँग्रेस पक्षाने सरळसरळ इंदिरा काँग्रेस पक्षात विलीन होण्याचाच निर्णय घेतला. त्यानंतर राणे यांनी गोव्याचे सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला.
१९८१ साली पणजीच्या ‘दि नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा मी बातमीदार बनलो. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीच्या दैनिकांसाठी आजतागायत म्हणजे चालू २०१९च्या निवडणुकीच्या बातम्या आणि वार्तापत्रे मी लिहीत आहे. (गंमत म्हणजे मला स्वतःला मतदानाचा अधिकार मिळाला तो लग्न झाल्यानंतर माझ्या पायाखालची भिंगरी गायब होऊन मी पिंपरी-चिंचवडला १९९३ ला स्थायिक झाल्यानंतरच!)
गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश त्यावेळी एकच जिल्हा होता. लोकसभेचे मात्र आतासारखेच उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी उत्तर गोव्यात हिंदू आणि दक्षिण गोव्यात कॅथोलिक खासदार निवडून येई. (अल्पसंख्याकांना शक्यतो डावलण्याचे धोरण असलेल्या सत्ताधारी भाजपने अल्पमताने का होईना, पण दक्षिण गोव्यातही हिंदूच खासदार राहतील अशी यशस्वी चाल आता राबविली आहे.) गोव्यात नंतरच्या काळात लोकशाही पद्धतीचे आणि पक्षांतर बंदी कायद्याचे धिंडवडे निघायला सुरुवात झाली आणि तो प्रकार आजही चालू आहे. १९९०च्या दशकात काही आठवड्यांसाठी, सहा महिन्यासाठी, एक वर्षांसाठी मुख्यमंत्री होण्यासाठी रांग लागल्यामुळे त्या काळात सक्रिय असलेल्या अनेक आमदारांना मुख्यमंत्री होता आले.
गोवा सोडून मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये रुजू झालो आणि लगेच १९८९च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सहभागी झालो. पंतप्रधान राजीव गांधींची पुण्यात स.प. कॉलेज मैदानावर झालेल्या त्या सभेत त्यावेळी विशीत असलेल्या राहुल गांधींना मी पहिल्यांदा पाहिले. सभेहून परतल्यावर निवासी संपादक प्रकाश कर्दले यांना त्या बातमीचा इन्ट्रो सांगितला, तर ते म्हणाले- “अशा प्रकारची बातमीसाठी “इंडियन एक्सप्रेस’ने आपला बातमीदार सभेसाठी का पाठवायचा? अशी बातमी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) कडून येईलच की!” तोपर्यंत मी अँटी-इस्टॅब्लिशमेंट दैनिकात कधी काम केले नव्हते, याची त्याक्षणी मला जाणीव झाली. या निवडणूक काळात ‘इंडियन एक्सप्रेस’साठी वार्तांकन करण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्हा मी पिंजून काढला होता.
पुण्यात १९८९च्या लोकसभा मतदानपत्रिकांची मोजणी सकाळी सुरू झाली. रात्रीपर्यंत काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ आणि भाजपचे अण्णा जोशी यांच्यात आघाडीसाठी लढत चालू होती. जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील निवडणूक अधिकारी होते. रात्री साडेदहाला मी कार्यालयात परतून मतांच्या आघाडीच्या आधारे ‘भाजपच्या अण्णा जोशींची निवड निश्चित’ अशी बातमी दिली, त्यानुसार इंडियन एक्सप्रेसच्या पुणे म्हाफुसिल आवृत्तीत ‘भाजपचे अण्णा जोशी जिकंले’ अशा शीर्षकाची बातमी होती. माझ्यानंतर डेडलाइनपूर्वी आमच्या दुसऱ्या बातमीदाराने बदललेल्या मतांच्या आघाडीनुसार बातमी दिली आणि शहर आवृत्तीत बातमीचे बदलेले शीर्षक होते- ‘काँग्रेसचे गाडगीळ जिंकले!’
या निवडणुकीत राजीव गांधी पराभूत झाले आणि विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले. काही महिन्यांत ते सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. या काळात विरोधी पक्षनेते राजीव गांधी पुण्यात आले असता, त्यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर होतो आणि त्यांच्यांबरोबर हस्तांदोलन करण्याचा योग लाभला. १९९१ मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. या काळात बाळासाहेब विखे अहमदनगरमधून अपक्ष म्हणून लढत होते. त्यावेळी प्रचार आटोपून अहमदनगर निवडणूक कार्यालयात विखे परतल्यानंतर त्यांची ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे अभय वैद्य आणि मी मध्यरात्र टळल्यानंतर तासभर मुलाखत घेतली होती. विखेंनी त्या काळात प्रचारात चांगली आघाडी घेतली होती, मात्र एका राष्ट्रीय दुर्घटनेने मतदारांचा कौल ऐनवेळी बदलल्याने विखे हरले आणि यशवंतराव गडाख जिंकले. (विखेंनी मात्र सर्वोच्च न्यायालयात जाऊन गडाखांची ही निवड रद्द ठरवली आणि गडाखांना सहा वर्षे मतदानात आणि निवडणुकीत सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली. अशाच प्रकारची नामुष्की देशाच्या इतिहासात केवळ शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना आमदार रमेश प्रभू यांच्यावर धर्माच्या नावावर मते मागण्यामुळे आली होती.)
त्याच मे महिन्याच्या एका रात्री झोपायला गेल्यानंतर माझ्या रूममेटने मला गदागदा हलवून जागी केले- ‘राजीव गांधींची हत्या झाली. उठ लवकर!’ मी उठून धावत शिवाजीनगरच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कार्यालयात गेलो, तेथे टाइम्स समूहाचे सर्व बातमीदार आणि संपादकीय मंडळी कामात गुंतली होती. राजीव यांच्या हत्येआधी निवडणुकाच्या दोन फैरी पार पडल्या होत्या. उरलेल्या निवडणुका काही आठवडे पुढे ढकलण्यात आल्या.
योगायोगाने त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर विजनवासात गेलेले पी. व्ही. नरसिंह राव काँग्रेसाध्यक्ष बनले आणि ‘काँग्रेसला सत्ता मिळाल्यास पंतप्रधानांच्या शर्यतीत आपण असू’ असे पवार यांनी जाहीर केले. बारामती मतदारसंघ प्रसारमाध्यमांसाठी त्यामुळे महत्त्वाचा ठरला. त्यावेळी बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्यासाठी स्थानिक वार्ताहर मदतनीस म्हणून मला करण्याची मला संधी मिळाली. बारामतीहून मुख्यमंत्री पवार यांच्याच गाडीत बसून पुणे विमानतळाच्या दिशेने जात असताना मिलर, मी आणि इतर दोन पत्रकारांनी पवार यांची अर्धा-पाऊण तास मुलाखत घेतली. हा एका वेगळाच अनुभव होता. या निवडणुकीच्या शेवटच्या दोन फैरींत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस सत्तेवर आली आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले.
त्यांनतर केंद्रातील अस्थिर सरकारांमुळे १९९६, १९९८ आणि १९९९ ला लागोपाठ लोकसभा निवडणूक झाल्या. काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी १९९८ची पुण्याची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली होती, त्यांच्या प्रचारसभेसाठी खुद्द पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते यावर आज अनेकांचा विश्वासही बसणार नाही. कलमाडींच्या उमेदवारीस ठाम विरोध असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी कलमाडींना उद्देशून ‘इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकाची’ उपमा दिली होती. आणि झालेही तसेच! त्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठल तुपे जिंकले, कलमाडींचे हाडवैरी बनलेल्या शरद पवारांनी काही महिन्यातच काँग्रेस सोडली अन दोन-तीन दिवसांतच कलमाडी पुन्हा काँग्रेसवासी झाले आणि नंतर पुण्यातून दोनदा लोकसभेवर निवडूनही आले.
१९९९मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या. महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेना-भाजपचे सरकार होते. याच वेळी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. कारगिल युद्ध नुकतेच घडले होते. या घडामोडींमुळे महाराष्ट्रात सहा महिने आधीच विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्रात झालेल्या या दुहेरी निवडणुकीत मतदारांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला महाराष्ट्रातील जनतेने झुकते माप देऊन ४८पैकी २८ जागा दिल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर आले. महाराष्ट्रात मात्र मतदारांनी शिवसेना-भाजप युती सरकारविरुद्ध कौल देऊन राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण केली. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर बरेच दिवस सत्तेसाठी दावा करण्यासाठी कुठलाच पक्ष सामोरे येईना, तेव्हा राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी विधानसभा स्थगित ठेवण्याचा इशारा दिला. मग अपरिहार्यता म्हणून राष्टवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसशी घरोबा करून सत्तेवर आली आणि आघाडीची ही सत्ता तब्बल १५ वर्षे टिकली!
१९९९नंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत मी रुजू झालो. तेथील नोकरीच्या काळात विधानसभेची वा लोकसभेची कुठलीही निवडणूक झाली नाही. पत्रकारितेच्या माझ्या व्यवसायात निवडणुकीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली नाही, असे त्यामुळे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे एकमेव दैनिक ठरले. .
सकाळ माध्यम समूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड’ आणि नंतर ‘सकाळ टाइम्स’ या इंग्रजी दैनिकांसाठी २००४ च्या आणि त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांनिमित्त वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. देशात ‘फिल गुड’ आणि ‘इंडिया शायनिंग’ वातावरण असल्याने लोकसभेच्या निवडणुका सहा महिने आधीच घेण्याचा निर्णय भाजपने २००४ साली घेतला. निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपच्या एका नेत्याच्या साडी वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन अनेक गरीब महिला ठार झाल्या आणि ‘इंडिया शायनिंग’च्या फुग्याला छोटीशी टाचणी लागली. या घटनेने वातावरण वेगाने बदलत गेले, हे निवडणूक निकालांनंतरच कळाले. वाजपेयी सरकारचा पराभव होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या घटनेने अगदी कसलेल्या राजकीय पंडितांनाही धक्का बसला.
२०१४ च्या निवडणुका तर अगदी अलीकडच्या आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या आठवणीत आहेत. आपला जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे!
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment