पत्रकारीतेतील राशीभविष्य आणि मटक्याचे आकडे
कामिल पारखे
कुठल्याही व्यवसायात, दररोजच्या कामात काही गोष्टी रुटीन आणि त्यामुळे कंटाळवाण्या असल्या तरी काही गोष्टी मजेशीर आणि थ्रिल देणाऱ्या असतात. त्यामुळे कामातील मरगळ कमी होते आणि पुढचे काम सुरू करायला ताजेतवाने बनवते. श्रीरामपूरच्या त्या मराठी दैनिकाच्या इनमिन तीन-साडेतीन महिन्यांच्या कारकिर्दीत माझ्याकडे असेच एक काम होते जे मी पत्रकार म्हणून आधी कधीहि केले नव्हते आणि नंतरही केले नाही. कुठल्याही दैनिकात सकाळी आणि दुपारी आतली काही पाने आधी पूर्ण करायची असतात. या पहिल्या कामांत आकाशवाणी, आजचे कार्यक्रम वगैरे सदरांसाठी मजकूर सोडावा लागत असे. त्या आतल्या पानांवर 'आजचे भविष्य' असे एक लोकप्रिय सदर होते. सकाळी येणाऱ्या एखादया ज्युनियर उपसंपादकाकडे ह्या सदराचे मॅटर पाठविण्याची जबाबदारी असे.
यासाठी प्रत्येक राशीच्या चिन्हासमोर केवळ एक वाक्याचे भविष्य लिहावे लागत असे आणि ते भविष्य वर्तवण्याचे काम ड्युटीवरच्या उपसंपादकालाच करावे लागत असे. सुदैवाने या भविष्यवाणीतील सर्व वाक्ये आधीच तयार करुन ठेवलेली होती. उदाहरणार्थ, प्रकृती सांभाळा, खिसे सांभाळा, तोंड सांभाळा, पोट सांभाळा, गोड किंवा कडू बातमी मिळेल, अचानक धनलाभ, मनस्ताप होईल, पाहुणे येतील, बढती मिळेल, प्रवास घडेल, वादावादी टाळा, वगैरेवगैरे. हिच वाक्ये विविध राशींसाठी निव्वळ आलटून पालटून वापरायचे ते काम होते. एखादा सृर्जनशील, उत्साही उपसंपादक असेल तर तो मूळच्या वाक्यांत स्वतःच्या नव्या वाक्यांची भर टाकण्याचे योगदान करत असे. आमचे एका ज्येष्ठ मुख्य संपादक सांगत असत की दैनिकाचे अनेक वाचक हे सदर आवर्जून वाचतात आणि थोड्या वेळानंतर विसरूनही जातात. मात्र एखादया दिवशी राशीभविष्यानुसार खरच खिशाला मोठी कात्री लागली किंवा प्रकृती बिघडली तर त्यांना त्या दिवसाच्या राशी भविष्याची त्यांना आठवण होत असे. या सदराला कुणाही ज्योतिषाचार्य वगैरेचे नाव नसायचे, त्यामुळे वाचकांनीही ते राशीभविष्य फार गंभीरतेने घेऊ नये असा एकंदर हा मामला होता.
ही घटना १९८८ सालची आहे. त्यादिवशी संध्याकाळी संपादकांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलाविले ते कशासाठी याची मला कल्पना नव्हती. गोव्यात आठ वर्षे इंग्रजी वृत्तपत्रात बातमीदारी करुन, तसेच पालेकर आयोगाच्या वेतनश्रेणीच्या बऱ्यापैकी पगारावर आधी काम करुन आता मी या मराठी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रुजू कसा झालो याचे माझ्या सहकाऱ्यांना जसे अजूनही आश्चर्य वाटत होते तसेच जिल्हा पातळीवरील या दैनिकांत होणाऱ्या कामकाजाविषयीं मलाही अचंबा वाटत असे. उदाहरणार्थ, पीटीआय आणि युएनआय वृत्तसंस्थांच्या मशिनांच्या सततच्या आवाजाने डिस्टर्ब होते, म्हणून येथे दिवसभर ही दोन्ही मशीने बंदच ठेवली जायची. संध्याकाळी बॅटरीवरच्या रेडिओवर प्रादेशिक बातम्या वा विधिमंडळाचे समालोचन ऐकून उपसंपादक दुसऱ्या दिवशीच्या अंकाच्या बातम्या तयार करायचे ! त्यादिवशीही संपादकांनी मला दिलेला आदेशही असाच धक्कादायक आणि पत्रकारितेच्या व्यवसायातील नैतिकता आणि मूल्ये याविषयी असलेल्या माझ्या श्रद्धांवरच आघात करणारा होता.
मुख्य संपादक वसंतराव देशमुख यांनी आधी पुण्यात पीटीआयचे बातमीदार म्हणून काम केले होते. जिल्हापातळीवरील दैनिकाचे संपादक या नात्याने ते सर्व स्थानिक सर्व राजकारण्यांना आणि इतर नेत्यांना धरून असत. कुठल्याही मोठया संस्थेची, राजकीय पक्षाची सभा, कार्यक्रम असो, ते जातीने नि:पक्षपणे व्यासपीठावर हजर असायचे. तिथल्या पांढरे कापड अंथरलेल्या गादीवर बसून, लोडाला टेकून सर्व भाषणे ते ऐकत. कार्यक्रमातील सर्व वक्ते आपल्या भाषणांत संपादकांचे नावही आवर्जून घ्यायचे, तिथला तो शिष्टाचारच होता. संपादकांना अर्धवट भाजलेली मशेरी तोंडात ठेवायची तलफ असायची. मशेरीची चिमूट गालाखाली ठेवून ब्रह्मानंदी टाळी लागल्यागत डोळे मिटून ते भाषणे ऐकत बसत. श्रोत्यांमध्ये बसलेला दैनिकाचा बातमीदार त्या कार्यक्रमाची बातमी लिहायचा. अशा या संपादकांविषयी, त्यांच्या व्यावसायिक नितीमत्तेबाबत माझ्या मनात निश्चितच आदर होता. त्यामुळेच आता ते मला देत असलेल्या सूचनांमुळे मी एकदम गोंधळून गेलो होतो.
संपादकांनी श्रीरामपूर शहरातील मटका चालविणाऱ्या प्रमुख पेढीचा फोन नंबर मला दिला होता. शहरातील मटका बुकीज त्या दिवसाची मटक्याची आकडे गोळा करण्याची मुदत संपल्यानंतर या सर्व आकड्यांची यादी या मुख्य पेढीकडे रात्री नऊच्या सुमारास आणून देत असत. आमच्या दैनिकाच्या पान एकचे काम रात्री साडेअकरापर्यंत संपायचे. त्यानंतर ऑफिसातच थांबून त्या फोन क्रमांकावर दररोज रात्री बरोबर बारा वाजता फोन करुन मटक्याचे आकडे विचारून ते पान एकवर चौकटीत टाकायचे असा संपादकांचा आदेश होता. दररोज हे काम एखादा उपसंपादक करायचा, तसे मीपण करावे असे त्यांचे म्हणणे होते. त्याकाळात अनेक राज्यस्तरावरील प्रतिष्ठित आणि इतरही दैनिके मटक्याची आकडे पान एकवर चौकटीत खुल्लमखुल्ला छापत असत. मटक्याच्या ओपन आणि क्लोज आकड्यांसाठी 'मुंबई, कल्याण', 'सोने,चांदी' अशी सांकेतिक नावे असायची.
मी गोव्यात असल्यापासून संपादक देशमुख यांच्याशी माझी चांगली ओळख होती. आमच्या संभाषणात अधूनमधून काही वाक्ये आम्ही इंग्रजीतून बोलत असू.
" डू दॅट जॉब एव्हरी नाईट बिफोर पुटिंग द न्युजपेपर टू स्लीप !" त्यांनी मला सांगितले.
''सर, मला हे काम करता येणार नाही.. .." मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. यावर काहीही न बोलता संपादकांनी मशेरीची चिमूट गालात अलगद बसवली आणि शांतपणे मला विचारले,
'कामिल, बट व्हाय कान्ट यू डू इट?'
'सॉरी सर, मटका नंबर घेणे हे माझ्या पत्रकारीतेच्या नैतिक मूल्यांशी विसंगत आहे. मला ते काम करणे आवडणार नाही. पत्रकारीतेच्या कामांत मटका आकडे घेण्याचा समावेश होऊ शकतो याची मी कल्पनाही करू शकत नाही.'' देशमुख सरांच्या तुलनेत मी खूप ज्युनियर असलो तरी आमचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते, त्यामुळेच असे बोलण्याचे धाडस मी करू शकलो.
'' पण पेढीकडून मटका आकडे घेणे अन ते दैनिकांत छापणे यात नैतिकतेचा प्रश्न येतोच कुठे ? आपला पेपर बहुसंख्य वाचक उद्या सकाळी घेणार ते मटक्याचा निकाल पाहण्यासाठीच ना ! बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून उद्या शपथ घेणार आहेत ही बातमी वाचण्यासाठी ते आपला पेपर विकत घेणार नाहीत.''
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सरचिटणीस म्हणून आणि इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टसचे राष्ट्रपातळीवरही अनेक वर्षे श्रमिक पत्रकारांच्या लढ्यांत सहभानी झालेल्या मला आता पत्रकार म्हणून मटक्याची आकड्यांविषयी विचारणा करणे आणि ही आकडे पानावर लावणे मला अगदी अपमानास्पद आणि माझ्या व्यावसायिक मूल्यांशी अगदी विसंगत वाटत होते. पालेकर वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी वृत्तपत्रांच्या मालकांशी मी भांडलो होतो, इंडियन एक्सप्रेसच्या सरोज गोयंका सदस्य असलेल्या अकरा-सदस्यीय बच्छावत वेतन आयोगासमोर मी गोव्यातील पत्रकारांच्या आर्थिक आणि इतर मागण्या मांडल्या होता. श्रमिक पत्रकाराची व्याख्या काय, त्यांची नेमकी कामे काय यावर मी अनेकदा बोलत असे. पत्रकार म्हणून स्वतःविषयी माझ्या मनात काही कल्पना होत्या आणि आता संपादकमहाशय मला पत्रकार या नात्याने मटक्यांचे आकडे घेण्याचे सांगत होते !
पण संपादक देशमुख यांच्याकडे माझ्या प्रश्नांसाठी, आक्षेपांसाठी चपखल उत्तरही तयार होते.
''कामिल, पत्रकारीतेच्या कुठल्या मूल्यांचा आणि नैतिकतेचा तू इतका बाऊ करतो आहेस ? आगरकर, लोकमान्य टिळकांची आणि गांधीजींची ध्येयवादी पत्रकारीता तू आता विसर. हे मटका नंबर, या पेपरमधल्या जाहिराती आपल्याला आपला पगार - ब्रेड आणि बटर - पुरवतात. यात काही अनैतिक, वावगे असे काहीच नाही. अन पुण्यातल्या त्या नावाजलेल्या दैनिकांनीसुद्धा आता मटक्याची आकडे छापायला सुरुवात केली आहेच ना ?"
संपादकांचा रोख कुठल्या दैनिकांकडे आहे ते मला कळले होते. त्यांच्या त्या प्रश्नानंतर आपली बाजू लंगडी आहे याची मला जाणीव झाली. यापुढे अधिक वाद करण्यात अर्थ नव्हता. दोन अंगुळे हवेत असलेला माझा पत्रकारीतेचा रथ संपादकांनीं आता जमिनीवर अगदी अलगदपणे आणून ठेवला होता !
त्या रात्री साडे अकरा वाजता पान एकचे काम संपल्यावर बारा वाजण्याची वाट पाहत मी राहिलो. भिंतीवरच्या घड्याळाचा तासाचा काटा बरोबर बारावर आल्यावर मी टेलिफोनवर तो दिलेला नंबर फिरवला. तिकडून आलेला आवाज सराईत माणसाचा होता. 'हं, घ्या लिहून , ओपन आहे चौदा आणि क्लोज आहे शुन्य तीन ! '' आणि फोन बंद झाला बहुधा तिकडच्या त्या व्यक्तीच्या टेलिफोनची घंटी यावेळी सतत वाजत असणार. मटका उद्योगातील माणसे आणि माझ्यासारखे इतरही पत्रकार त्यांना यावेळी फोन करत असणार हे उघड होते.
तेव्हापासून ते दैनिक सोडेपर्यंत अनेक दिवस माझा नेहेमीचा दिनक्रम ठरलेला असायचा, कामावर दुपारी आल्याआल्या राशीभविष्य आणि बरोबर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला मटक्याची आकडे !
Camil Parkhe
Journalist, author, blogger
9922419274
No comments:
Post a Comment