Did you like the article?

Showing posts with label Niranjan Uzgare. Show all posts
Showing posts with label Niranjan Uzgare. Show all posts

Saturday, August 30, 2025

 

                                                                    पौलस वाघमारे 

त्या दिवशी सकाळीसकाळी फोन लावला. ``गुड मॉर्निंग पौलस, कवी `विश्वासकुमार' हे नाव ऐकले आहे का?''


``हो, त्यांचे पूर्ण नाव संपत विश्वास गायकवाड. केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) आणि केशवकुमार (आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे) यांच्या धर्तीवर त्यांचे नाव विश्वासकुमार. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात ते शिक्षक होते.

``पाणी लाजलं, `जाता साताऱ्याला' या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती. ``सशाचे कान, झालेत लांब'' ही त्यांची बालभारती पाठ्यपुस्तकात असलेली कविता आम्हाला शाळेत होती, '' पौलस वाघमारे सांगत होते अन फोनच्या या बाजूला अवाक होऊन मी ऐकत होतो.

कधी काही अडचण झाली, आतासारखा असाच लेख लिहिताना लॅपटॉपवर माऊस अडखळला, पुस्तकांत शोधूनसुद्धा संदर्भ न सापडल्यामुळे आणि आठवण न राहिल्यामुळे गाडी अडली, पुढे जाईना कि पौलस वाघमारे यांना मग मी फोन करतो.

एकतर ते त्या शंकेचे समाधान करतात किंवा कुठे आणि कुणाकडे पाहिजे असलेली माहिती मिळू शकेल हे सांगतात.

पौलस वाघमारे हे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे (२०२३) विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षही आहेत.

गंमत म्हणजे त्यांची आणि माझी पहिली गाठभेट मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच झाली आणि आतापर्यंत आमचे सर्व समोरासमोरचे आणि फोनवरचे संभाषण आणि चर्चा ख्रिस्ती साहित्य आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनांबाबतच असते.

पुण्यात मॉडेल कॉलनीत चर्चच्या विद्याभवन स्कुलमध्ये १९९२ साली मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवण्यात येणार होते.

शाळेचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलानाध्यक्ष होते, शांता शेळके संमेलनाच्या उदघाटक होत्या आणि पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे पदाधिकारी म्हणून पौलस वाघमारे यजमान समितीत होते.

त्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि आम्हा दोघांची अशी पहिली मुलाखत झाली.

साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते आणि मी एक पत्रकार, आमच्या दोघांमध्ये असलेले हे नाते गेली तीस वर्षे आजतागायत कायम राहिले आहे.

ख्रिस्ती संमेलनांबाबत किंवा ख्रिस्ती साहित्यिकांबाबत कसलीही माहिती हवी असली कि पहिला फोन मी वाघमारे याना लावत असतो,

त्यानंतर मालवणला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आमची दुसऱ्यांदा गाठभेट झाली. निरंजन उजगरे त्यावेळी अध्यक्ष होते, मिलाग्रिस चर्चचे फादर गॅब्रिएल डिसिल्व्हा स्वागताध्यक्ष होते. शिवसेनेचे त्यावेळचे स्थानिक आमदार नारायण राणे उदघाटक होते.

नारायण राणे यांचे जोश निर्माण करणारे भाषण, संमेलनाच्या तीन दिवसांत माशांच्या जेवणाची मेजवानी आणि पौलस वाघमारे यांची भेट अशा काही या संमेलनाच्या आठवणी आहेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे गेली खूप वर्षे पौलस वाघमारे सचिव वगैरे पदांवर सतत राहिले आहेत आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी आपण मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊच अशी मनीषा आणि आकांक्षा बाळगून होते.

दरम्यानच्या काळात सिसिलिया कार्व्हालो यांची प्रस्तावना असलेला `मोगळ्यांचा कळ्यांचा सुवास' हा एक काव्यसंग्रह (साल २०००) त्यांच्या नावावर जमा झाला होता. अर्थात एकही साहित्य कलाकृती नसलेल्या काही व्यक्ती ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी लोक कायकाय खटपटी करतात हे त्यांनी जवळून पाहिले आणि एकदा त्यावर पदरमोड करून अनेक जणांची नावे देऊन एक पुस्तिकाच छापली आणि भरपूर लोकांना वाटली.

याची पौलस वाघमारे यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली.

एका व्यक्तीने त्यांच्यावर पुण्यात शिवाजीनगर कोर्टात बदनामीचा दावा दाखल केला, सुनावणी काही वर्षे चालली, वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला तर अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले, तिथेही वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला.

त्या अर्जदाराने सुदैवाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले नाही आणि वाघमारे यांची अशाप्रकारे या कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांतून सुटका झाली.

त्यांचे एक वकील मित्र असलेल्या मराठी साहित्य परिषदेचे एक पदाधिकारी प्रमोद आडकर यांनी न्यायालयात वाघमारे यांची बाजू लढवली होती.

हे प्रकरण ऐकले तेव्हा खूप वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या असलेल्या एका साहित्यिकाने राबवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेबद्दल वृत्तपत्रांत टीका वाचल्याचे आठवले.

उमेदवार असलेल्या त्या नामदार महोदयांनी चक्क विमानप्रवास दौरे केले होते असे काहीसे आठवते.

त्यानंतर लगेचच पौलस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली, तो पण एक वेगळाच किस्सा आहे. असो.

बीड येथे २०२३ साली पार पडलेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती संमेलनाचे अध्यक्षपद पौलस वाघमारे यांनी भूषवले.

तीन दशकांपूर्वी झालेल्या मालवणच्या संमेलनानंतर आतापर्यंत एकही संमेलनाला मी हजर राहिलो नाही आणि वाघमारे यांनी एकही संमेलन चुकवलेले नाही.

फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या आग्रहास्तव मला ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या समितीत घेतले होते, मी एकाही बैठकीला गेलो नव्हतो.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक पदाधिकारी म्हणून वाघमारे यांची सगळीकडे मांडवात आणि मंचावरसुद्धा उपस्थिती असते.

आता होऊ घातलेल्या नाशिक येथील संमेलनाचे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आणि संमेलनाची तयारी करण्यात ते गर्क आहेत.

नंतरच्या भावी संमेलनांत एक माजी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान असणार आहेच.

तर सांगायचा मुद्दा असा कि पौलस वाघमारे साहित्य संमेलने असे प्रत्यक्ष जगत आले आहेत.

त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा मोठा साठा आहे, अनेक पुस्तके वाळवीला भक्ष्य पडली आहेत तरी रस्त्यावर नवनवी दुर्मिळ पुस्तके घेण्याची त्यांची हौस थांबत नाही.

विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह बाळगणारे वाघमारे स्वतः ही पुस्तके वाचत नाहीत. त्यांना फक्त पुस्तक संग्रहाचा छंद आहे. काही हजार पुस्तके त्यांच्याकडे असतील.

त्यांची ही बाब आता कळल्यामुळेच त्यांना सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या मिचेल दाम्पत्य आणि सिंथिया फरार यांचे माझे नवे पुस्तक काल मी त्यांना दिले नाही.

त्यांनी त्यांचा `व्यक्त सत्य' हा नवा लघुकथासंग्रह मला दिला, तो मात्र मी स्विकारला. अर्थात मी हे पुस्तक वाचणार आहे. कालच्या भेटीतील भर पावसात रस्त्यावर घेतलेला हा फोटो.

साहित्य वाचण्याऐवजी साहित्यिक आणि माणसे वाचण्याची, जोडण्याची त्यांची प्रचंड हौस आहे.

या साहित्य संमेलनांकडे मी फिरकत नसतो तसेच पत्रकार असलो तरीही नामवंत साहित्यिकांशी माझा कधी संबंधसुद्धा आलेला नाही.

माजी संमेलनाध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हरेगावच्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी प्रवचनाला आले होते तेव्हा शाळेत असताना त्यांना मी पहिल्यांदा ऐकले होते.

तेव्हापासून फादरांना मी जेमतेम तीनवेळा भेटलो. संभाषण असेल केवळ पाचसहा वाक्यांपुरते.

जवळपास अशीच बाब इतर साहित्य संमेलनाध्यक्षांबाबत.

वाघमारे यांचे अगदी याउलट आहे.

सत्यवान नामदेव सुर्यवंशी हे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतले पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे लेखक. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या `प्रसादचिन्हे' या ग्रंथात हे स्पष्ट केले आहे.

पत्रकारितेची माझी सुरुवात मुळी स. ना. सूर्यवंशींच्या आपण साप्ताहिकातून झाली असे म्हणायला हरकत नाही.

श्रीरामपूरला मी दहावीत शाळेत असताना सूर्यवंशींच्या नाशिक येथल्या `आपण' साप्ताहिकात माझ्या दोन कथा बाल सदरात छापल्या होत्या आणि पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पोस्टाने मला घरी पाठवल्या होत्या.

लिखाणाचा हा माझा पहिला मोबदला.

त्यानंतर दैनिकांत बातम्या लिहितच माझी संपूर्ण कारकिर्द झाली.

सूर्यवंशींचे अल्पचरित्र माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत आहे.

तर या सूर्यवंशींना मी एकदाच पाहिले आणि ऐकले, त्यांच्या निधनापूर्वी सहा महिने आधी पुण्यात २००० ला.

या सुर्यवंशी यांच्या भेटीचा वाघमारे यांनी एक अनुभव काल सांगितला तेव्हा मी थक्क होऊन मी ऐकत होतो.

वाघमारे यांचा संमेलने आणि साहित्यिक त्यांच्याबाबत असा अगदी समृद्ध अनुभव आहे

हे सर्वच कडूगोड अनुभव लिहिण्यासारखे नसले तरी त्यांव्याकडून ऐकण्यासारखे निश्चितच आहेत.

सन १८२७ पासून सुरु झलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षस्थानी थोर लोक राहिलीयेत,

`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, स. ना. सूर्यवंशी, निरंजन उजगरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो ही त्यापैकी काही नावे.

पौलस वाघमारे या यादीतील अलीकडचे शेवटचे नाव.

या लोंकांसारखे आपण बुद्धिमान, थोर साहित्यिक नाही याची जाणीव वाघमारे यांना आहे. तरी संमेलनाध्यक्ष झाल्याबद्दल ते कृतार्थ आहेत.

अलीकडेच पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सत्कार झाला. तिथे लोक त्यांच्याविषयी भरभरून बोलले.

लेखक, कवी आणि एक साधा, निर्मळ मनाचा माणूस म्हणून अनेक लोक पौलस वाघमारे यांना ओळखतात.

अशी माणसे विरळ असतात.

Camil Parkhe August 30, 2025