राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
आता निर्माण झाले आहे जवळपास अगदी तसेच वातावरण सहासात वर्षांपूर्वी निर्माण झाले होते.
राष्ट्रपती सदनातून नुकतेच पायउतार झालेले महामहिम प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्विकारले आहे असे वृत्त झळकले तेव्हा आतासारखाच पुरोगामी गटात सन्नाटा पसरला होता आणि प्रतिगामी म्हणा किंवा उजव्या गटात म्हणा आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.
प्रणवदा यांच्या रुपाने संघाच्या गळाला खूप मोठा देवमासा लागला होता यात शंकाच नव्हती.
इंदिराबाईंच्या हत्येनंतर मॅडमच्या मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे स्थान असलेल्या मुखर्जी यांनी लगेच एक क्रमांकाच्या जागेवर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधान पदावर आलेल्या राजीव गांधी यांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवले होते.
विजनवासाचा तो अल्पकाळ वगळता त्यांची संपूर्ण कारकीर्द सत्तेच्या उबेत गेलेली होती. स्वबळावर आपल्या पश्चिम बंगाल राज्यात कुठल्याही पदावर निवडून येण्याची क्षमता नसतानासुद्धा.
नवलाची बाब म्हणजे नंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आल्या आणि नंतर त्यांनी आपल्या पक्षाला महाराष्ट्रासह विविध राज्यांत पुन्हा सत्तेवर आणले, केंद्रातही सलग दोनदा सत्तेवर आणले.
या काळात प्रणवदा त्यांचे सर्वांत अधिक विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच मुखर्जी देशाच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपतीपदावर पोहोचले.
काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हेच प्रणव मुखर्जी संघाच्या गळी लागले. प्रणवदा यांनी संघाच्या मंचावर जाण्याचे निमंत्रण स्विकारले यावरुन त्यावेळी मोठे वादंग निर्माण झाले होते.
असे असतानाही मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात हजर राहिले, तेथे त्यांनी भाषणा केले. ही बाब संघाने आपलीच पाठ थोपटून घेण्यासारखी होती यात वादच नव्हता.
नंतर प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या हयातीतच आणि सर्व संवेदना शाबूत असताना भारतरत्न मिळाले.
त्याबद्दलसुद्धा त्यांना अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल.
हे भाग्य तर भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला आजतागायत लाभलेले नाही.
संघाला आणि भाजपला आपले नेते आणि आदर्श नेहेमीच आयात करावे लागतात, हल्ली आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा.
आपल्या घरातील व्यक्तीने - मग ते पंतप्रधान का असेनात - आपले कौतुक करावे यात काय ते विशेष?
आपल्याला कधीकाळी पाण्यात पाहणार्या लोकांनी आपल्या मांडवात येऊन, आपल्या झेंड्याखाली येऊन, आपल्या प्रतिमांना वंदन करणे निश्चितच अभिमानास्पद असते.
त्यामुळेच खासदारबाईंची कार्यक्रमात हजेरी, जुन्या काँग्रेस नेत्यांचे गणवेशातले संचलन आणि झेंड्याला सलामी याला महत्त्व आणि बातमीमुल्य प्राप्त होते.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment