एकेकाळी मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमधल्या गवळी आणि मोरे या बौध्द तरुणांनी विधानसभेत अक्षरशः आग ओकली होती
आपला भारत देश सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना मुंबईतील काही तरुण वेगळ्याच मनःस्थितीत होते.
१५ ऑगस्ट १९७२ या दिवशी स्वातंत्र्यपूर्तीचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होत होते.
अशा लाजिरवाण्या घटनांविरुध्द राग व्यक्त करण्यासाठी त्यावेळी गवळी आणि मोरे या तरुणांनी विधानसभेच्या सज्जात हवेत आपल्या तोंडातले रॉकेल सोडून त्याला काडी लावली होती.
यानंतर लगेचच त्या दोन्ही तरुणांना तातडीने अटक करण्यात आली होती.
त्यांच्याविरुध्द हक्कभंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर भारताचा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवदिन `काळा स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळायचा असे मुंबईतील दलित तरुणांनी ठरवले होते.
त्यावेळी साप्ताहिक साधनाने ` २५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य' हा विशेषांक काढला होता.
त्या विशेषांकातील राजा ढाले यांच्या एका लेखामुळे वादळ झाले, नवा इतिहास घडला आणि नामदेव ढसाळ, राजा ढाले हे त्यांच्या नव्या दलित पँथर या संघटनेसह एकदम प्रकाशझोतात आले.
साधना साप्ताहिकसुद्धा.
साधनाचे कार्यकारी संपादक अनिल अवचट यांनी हा विशेषांक काढण्यात पुढाकार घेतला होता.
मागील अर्धशतकाच्या सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहांमध्ये समावेश करावा लागेल असा राजा ढाले यांचा `काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख आहे असे `साधना' साप्ताहिकाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी म्हटले आहे.
राजा ढालेंचा हा लेख एकप्रकारे केंद्रस्थानी असलेल्या `२५ वर्षांतील `दलितांचे स्वातंत्र्य' १५ ऑगस्ट १९७२ सालचा साधना’ विशेषांक आणि त्यावरील वादसंवाद’ या नावाचे पुस्तक साधना प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केले आहे.
त्या पुस्तकातील शिरसाठ यांचे हे पहिलेच वाक्य आहे.
राजा ढाले यांचा `साधना' विशेषांकातील संपूर्ण लेख खूपच जहाल आहे, त्यातील अनेक विधाने आजही लागू पडतात.
देशाच्या स्वातंत्रोत्तर काळात परकी राजवट जाऊन आलेल्या स्वकीय राजवटीबद्दल ढाले यांनी अत्यंत कडवटपणे लिहिले आहे.
``लोकांना हवा असलेला 'संयुक्त महाराष्ट्र' मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांचे बळी द्यावे लागतात, ही लोकशाही का?
आणि हे बळी कोणी घेतले? ब्रिटिशांनी कि स्वकीयांनी? एकूण परकीय राजसत्तेपेक्षा स्वकीय राजसत्ता अधिक घातक आहे!
बरे, आम्ही निवडून दिलेले आमदार मत मागणीसाठी आमच्या दारात येतात आणि आमच्या मागणीसाठी आम्ही विधानसभेच्या दारात तोंड वेंगाडत जावे, आणि हे विधानसभेतून खाली उतरत नाहीत,
भेटायला समोर येत नाहीत, तर पोलिसांना पुढे पाठवतात! हे कसले आमचे प्रतिनिधी?
आणि हे काय आमचे दुःख थोडेच वेशीवर टांगणार आहेत?
टांगणार नाहीत, हा अनुभव असल्यामुळेच गवळी-मोरे यांनी या दुःखाची आग ओकून विधानसभेचे लक्ष खेचले ना? तरी त्यांना अटक? मग त्यांनी दुःख तरी कुणाला सांगायचे नि त्यांचा वाली कोण?'
``बरे, या दोघांनी विधानसभेचा कसला हक्कभंग केला आणि विधानसभेला कसली बाधा आणली?
अत्याचाराच्या प्रश्नांवर लक्ष खेचुन आणण्यासाठी विधानसभेच्या सज्जात हवेत तोंडातील रॉकेल सोडून त्याला काडी लावली, याने कुणाला इजा झाली? मग त्यांना का अटक?
आणि विधानसभेचे नियम वेगळे का? ती काय आकाशातून पडली? ती लोकांनीच बनलेली आहे ना? लोकांचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी आहे ना?
मग निवडून दिलेले आमदार हे काम करत नाहीत म्हणून, जर लोकांनी ते हातात घेतले, वेशीवर मांडले, तर तो गुन्हा ठरतो !
वा रे राजवट! आणि या अटकेबद्दल सर्वांचे एकमत म्हणूनच आमचं एकमत झालेय कि, आम्ही दिलेला आमदार केव्हाही परत घेऊ शकतो,
नाहीतर पाच वर्षे हे लडदू असेच खुर्च्या तापवणार, पेंगणार, झोपणार. ''
विधानसभेच्या प्रेक्षक सज्जात आग लावण्याच्या या प्रसंगानंतर काही काळानंतर एका तरुणाने तर चक्क प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारून आपला निषेध व्यक्त केला होता.
त्या तरुणाला सुद्धा लगेच सभागृहातील मार्शलांनी पकडले होते.
हाच तरुण नंतर आमदार म्हणून निवडून आला, त्याच सभागृहात सन्मानाने आला.
इतकेच नव्हे तर त्या सभागृहाचा सभापतीही झाला.
नगर जिल्ह्यातले बननराव ढाकणे त्यांचे नाव
कालच्या विधानभवनातील गोंधळानंतर विधिमंडळ अधिवेशनात अभ्यागतांना सरसकट प्रवेशबंदी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे अशी बातमी आज प्रसिद्ध झाली आहे.
मला वाटते यामुळे आता अशा घटना विधिमंडळात बहुधा पुन्हा घडणार नाही.
Camil Parkhe July 19, 2025
No comments:
Post a Comment